नाशिक | Nashik
सरकारचा (Government) निष्काळजीपणा दुष्काळापेक्षाही घातक असून, अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना बँकांच्या नोटीसा येणे अत्यंत गंभीर आहे, असा घणाघाती आरोप शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांनी केला. सध्या आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असून, त्यांनी आज (मंगळवारी) नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथून या दौऱ्याला सुरुवात केली.
शेतकऱ्यांशी थेट संवाद आणि व्यथा जाणून घेतल्या
दौऱ्याची सुरुवात करताना मनेगाव (Manegaon) येथे आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी थेट बांधांवर जाऊन संवाद साधत दुष्काळामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची आणि आर्थिक अडचणींची माहिती घेतली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या ५,००० रुपयांच्या मदतीबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करून ही मदत प्रत्यक्षात कितपत मिळाली, याची वस्तुस्थिती त्यांनी जाणून घेतली. तसेच दिवाळीसारखा मोठा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या घरात चिंतेचे सावट आहे. हातात पैसा नाही, शेतात उत्पन्न नाही आणि समोर सणासुदीचा खर्च, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाच्या व्यथा त्यांनी ऐकून घेतल्या.
दरम्यान, ऐन दिवाळीच्या (Diwali) तोंडावर आदित्य ठाकरे यांच्या या दुष्काळी पाहणी दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे. या पाहणी दौऱ्याप्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांच्यासह अनेक शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. नाशिकचा (Nashik) दौरा आटोपून आदित्य ठाकरे पुढे छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले. त्यांनी त्याठिकाणी दुष्काळ आणि पाणीटंचाईची माहिती घेतली.




