मुंबई | Mumbai
इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेट स्पर्धेचा विसावा हंगाम तोंडावर आला असताना, चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाने एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. संघाचा यशस्वी कर्णधार आणि यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) अखेर आयपीएलमधून अधिकृतपणे निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या १९ वर्षांपासून आयपीएल गाजवणारा ‘थाला’ आता आगामी हंगामात एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
मार्गदर्शक म्हणून नवी जबाबदारी
खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर महेंद्रसिंग धोनी आता चेन्नई सुपर किंग्स संघासोबत (Chennai Super Kings) नव्या भूमिकेत जुळणार आहे. आगामी आयपीएल हंगामासाठी फ्रँचायझीने धोनीची अधिकृतपणे ‘मार्गदर्शक’ (Mentor) म्हणून निवड केली आहे. त्याच्या या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा फायदा आगामी काळात संघाला नक्कीच होईल.
धोनीची ऐतिहासिक कारकीर्द आणि विक्रम
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने ५ वेळा आयपीएल (IPL) स्पर्धा आणि २ वेळा चॅम्पियन्स लीग टी-२० चे विजेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आयपीएलच्या इतिहासात धोनीने चेन्नई सुपर किंग्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या दोन्ही संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. आपल्या २७८ सामन्यांच्या आयपीएल कारकिर्दीत धोनीने ५,४३९ धावा केल्या आहेत. यामध्ये २४ अर्धशतकांचा समावेश असून ८४ धावा ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे.
तर यष्टीरक्षक म्हणून धोनीने १५५ झेल आणि ४६ स्टम्पिंग करत अनोखा विक्रम नोंदवला आहे. धोनीने विक्रमी २३५ सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले असून, त्यापैकी १३६ सामन्यांत आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या या निर्णयामुळे जगभरातील त्याच्या चाहत्यांमध्ये एकच चर्चा रंगली असून, खेळाडू म्हणून निवृत्ती (Retired) घेतल्यानंतरही तो ‘मार्गदर्शक’ म्हणून चेन्नई संघासोबत जोडलेला राहणार असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.



