मुंबई | Mumbai
माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताबाबत (Plane Crash) सोमवारी (दि.१६) रोजी आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत या अपघातामागे असलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांवरून भाजप नेत्यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. तर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे चांगले संबंध होते, असे म्हणत भाजपाच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे. तसेच रोहित पवारांना मित्रत्वाचा सल्ला दिला होता. त्याला आता आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांच्या पोस्टवर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “मी काल पत्रकार परिषदेतून सत्तेत असणाऱ्या नेत्यांना प्रश्न केला आहे. तुम्ही कार्यकर्त्यांची नावं घेत आहात. त्यामुळे त्यांनी काही पोस्ट करून वक्तव्य केलं, त्यावर मी उत्तर द्यावं, असं मला वाटत नाही. मी मोठ्या नेत्यांना फॉलो करत असतो. सगळेच ट्विट करतात आणि ते मी वाचलेच पाहिजे असं नाही”, असे त्यांनी म्हटले. रोहित पवारांच्या या पत्रकार परिषदेनंतर आणि सत्यजीत तांबे यांच्या या पोस्टमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सत्यजीत तांबे पोस्टमध्ये काय म्हणाले होते?
सत्यजीत तांबे यांनी आपल्या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांच्यातील घट्ट मैत्रीचा दाखला देत म्हटले की, “आज खरंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मनात काय भावना असतील, त्यांना किती दुःख झालं असेल, याची कल्पनाही न केलेली बरी. कारण स्व. अजितदादा पवार आणि देवेंद्रजी यांच्यातील मैत्री, विश्वास आणि परस्परांमधील नातं मी अतिशय जवळून पाहिलं आहे. गेल्या काही वर्षांतील राजकारणातील अनेक चढ-उतारांमध्ये अजितदादांनी देवेंद्रजींना खंबीर साथ दिली. स्वतःच्या राजकीय सोयीपेक्षा दिलेला शब्द पाळणारे अजितदादा होते. अशा अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर, कोणताही ठोस आधार नसताना या अपघाताला देवेंद्रजींशी जोडण्याचा प्रयत्न करणं, हा अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी प्रकार आहे.
अशा संवेदनशील प्रसंगाचं राजकीय भांडवल करणं मला अत्यंत चुकीचं वाटतं. रोहितजी, एका अभ्यासू आणि तरुण आमदार म्हणून तुमची ओळख निर्माण व्हायला हवी. तुमच्यात क्षमता आहे आणि भविष्यात मोठी भूमिका बजावण्याची संधी आहे. परंतु, प्रत्येक विषयावर तात्काळ प्रतिक्रिया देणं, प्रत्येक गोष्टीत टीका-टिप्पणी करणं आणि जणू संपूर्ण राज्याच्या विरोधी पक्षाची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे, अशा आविर्भावात वावरणं योग्य नाही. मोठा नेता होण्याची इतकी घाई चांगली नाही”, असे देखील तांबे पोस्टमध्ये म्हणाले आहेत. दरम्यान ही पोस्ट शेअर केल्यानंतर काही वेळातच सत्यजीत तांबे यांनी आपल्या पोस्टवरील कमेंट्स सेक्शन बंद केल्याचेही पाहायला मिळाले.




