नाशिक । प्रतिनिधी
कंटेंटमेंट झोन वगळता इतर ठिकाणची दुकाने पूर्णवेळ सुरु राहतील हा जिल्हाधिकार्यांचा आदेशाला पोलिसांनी केराची टोपली दाखवत गुरुवारी (दि.११) बाजारपेठेतील दुकाने पाच वाजता बंद करायला लावली. त्यामुळे दुकानदारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत अाहे. जिल्हाप्रशासन दुकाने पूर्णवेळ खुली ठेवा सांगते. तर पोलिस दुकाने बंद करायला सांगतात. या दोन्ही विभागांमध्ये समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी’ पुनश्च एकदा हरिअोम’ म्हणत राज्य अनलाॅक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानूसार बुधवारी जिल्हाधिकारी मांढरे यांनी पोलिस आयुक्त व मनपा आयुक्त यांची बैठक घेत शहर व जिल्ह्यात कंटेंटमेंट झोन वगळता सर्व दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवावीत असा निर्णय घेतला.
सकाळी ९ ते रात्री ५ ही मर्यादा शिथील करण्यात आली. दुकाने पूर्ण वेळ उघडी राहिल्याने गर्दी कमी होईल व करोनाचा संसर्ग टाळता येईल हा उद्देश होता. पूर्ण वेळ दुकाने उघडी ठेवण्याच्या निर्णयाचे व्यापार्यांनी स्वागत केले. मात्र गुरुवारी रविवार कारंजा, एमजी रोड व मुख्य बाजारपेठेतील दुकाने पोलिसांनी सायंकाळी ५ वाजता बंद करायला लावली.
सरकारवाडा पोलिसांनी बाजारपेठेत फिरुन दुकाने बंद करण्यास सांगितले. यावेळी दुकानदारांनी जिल्हा प्रशासनाचा निर्णयाची माहिती दिली. मात्र पोलिसांनी दुकाने बंद करायला भाग पाडले. त्यामुळे दुकानदार व व्यावसायिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणेत पुन्हा बेबनाव पहायला मिळाला.
दुकने कंटेनमेंट झोनच्या आतील असतील तर पाच वाजता बंद करावी लागतील. इतर दुकाने सुरु राहू शकतात. याबाबत पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. ते सूचना देत आहेत.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी
जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत.
– विश्वास नांगरे पाटिल, पोलिस आयुक्त




