नाशिक | प्रतिनिधी
आडगाव हद्दीत सोमवारी (दि. ३०) तीन शाळकरी मित्र निर्माणाधीन सोसायटीसाठी खोदलेल्या पसरट खड्ड्यात बुडून मृत्यू पावले होते. या घटनेचा शोक व्यक्त होत असतानाच बुधवारी दुपारी पुन्हा सातपूर परिसरात अशाच घटनेची पुनरावृत्ती घडली.
येथील भोर टाऊनशिपजवळ असलेल्या पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात खेळताखेळता चार मुले पाय घसरुन डोहात बुडाली. समोरील सोसायटी व गच्चीवर असलेल्या नागरिकांनी ही घटना पाहताच मदतकार्य करुन मुलांना सुखरुप बाहेर काढले. मात्र, उपचारादरम्यान, एका मुलाचा रात्री मृत्यू झाला. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयूर संजय भोंडवे (रा. जाधव संकुल) असे मृत मुलाचे नाव आहे. मयूर हा बुधवारी दुपारच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर तीन मित्रासमवेत घरी जात होता. टाऊनशिपजवळील रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागतील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात चार लहान मुले पाण्यात खेळत होती. पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडू लागली. यात समोरच्या इमारतीतील रहिवाश्यांनी ही घटना बघितल्यावर ताबडतोब घटनास्थळी धाव घेत इतर नागरिकांच्या मदतीने मुलांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र, नाका, तोंडात पाणी गेल्याने मयूर भोंडवे अत्यवस्थ झाला. त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. येथून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता पोटांत पाणी गेल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. शर्थीचे प्रयत्न करुनही रात्री त्याचा मृत्यू झाला.
परवानग्या नावालाच
शहरात विविध भागांत बेकायदेशीर बांधकामे सुरु असून अनेक विकसक व कंत्राटदारांनी महापालिकेच्या परवानग्या मिळवून त्यातील सूचना व खबरदारीच्या उपायोजनांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांत दोन हृदयद्रावक घटना घडल्या आहेत. बांधकाम व्यावसायिकांचा निष्काळजीपणा बालकांच्या व कामगारांच्या जीवावर बेतत आहे. सोसायटी बांधताना सर्वच नियम व निकषांना हरताळ फासून काम केले जात असून, कामगारांना सुरक्षासाधनेच दिली जात नसल्याने त्यांचे मृत्यू होत आहेत. अशा सोसायट्यांजवळ सुरक्षारक्षकच नेमले जात नसल्याने या घटना वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
दृष्टिक्षेपात…
- मागील नऊ महिन्यांत अकरा जणांचा मृत्यू.
- कामगार व बांधकाम मजुरांचे जीव अधांतरी.
- विकसकाकडून सुरक्षात्मक उपाययोजनांना फाटा.
- मृतांत १८ ते ३६ वयोगटातील पुरुष.
विकसकांच्या बेजबाबदारपणांमुळे झाले मृत्यू, - चार ते पाच प्रकरणांत सदोष मनुष्यवधाचे गुन्हे.
- मृतांत परप्रांतीय व आदिवासी बहुल भागातील तरुणांचा समावेश.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





