नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सिटीलिंक बसचालकांच्या (Citilink Bus) ‘बेशिस्त’ पणामुळे शहरात दिवसाआड गंभीर व किरकोळ स्वरुपाचे दोन अपघात (Accident) घडत आहेत. त्यामुळे नाशिककरांसह वाहनधारकांना जीव मुठीत धरुन चालावे लागत असताना नोव्हेंबर २०२५ च्या पहिल्याच दिवशी (दि.१) पंचवटी पोलिसांच्या हद्दीतील स्वामी नारायण चौकात ‘सिटीलिक’ बसच्या धडकेत पन्नास वर्षीय पादचारी ठार झाला.
काही बससचालकांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना जीव गमवावा लागत असून, सततच्या अपघातांनंतर या चालकांच्या ‘आरोग्य व फिटनेस’ तपासणीचा प्रश्न उभा राहिला आहे. चालकांची (Driveer) वैद्यकीय तपासणी वेळोवेळी केली जात आहे का? यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून प्रशिक्षण दिल्याचा दावा होत असला तरी बऱ्याचदा वर्दळीच्या ठिकाणी चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होतांना दिसते. वाहनांना खेटून बस नेणे, सिग्नलचे नियम न पाळणे, थांब्यावर न थांबणे, बसचा अतिवेग, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे सिटीलिंकचे अपघात झाले आहेत.
सिटीलिंकचे एकूण ‘बळी’
- १० जुलै २०२४ रोजी नाशिकरोडच्या मालधक्का रोडवरील मनपा सिटीलिंक बस डेपोमध्ये सानवी सागर गवई (वय ५) हिला सिटीलिंक बसने पाठीमागून धडक दिल्याने ती ठार झाली.
- १३ सप्टेंबर २०२२ रोजी (एमएच १५ जीव्ही ८०७१) या बसने नितेश वानखेडे याला धडक दिल्याने तो जखमी झाला.
- ७ ऑगस्ट २०२२ रोजी एमएच १५ जीव्ही ७९६८ च्या धडकेत अनोळखी पादचारी ठार.
- ७ फेब्रुवारी २०२३ रोजी सिटीलिंक बसमधून उतरताना विजय गुलाबराव बोरसे (वय ३२) यांचा माडसांगवी टोलनाका येथे मृत्यू.
- ९ एप्रिल २०२२ रोजी सिडकोतील दिव्या अॅडलॅब्जजवळ निंबा उखा ह्याळीज (वय ७०) यांचा बसच्या धडकेत मृत्यू,
- ६ मे २०२२ रोजी सिटीलिंक (एमएच १५ जीव्ही ८००६) धडकेने पंडित भागूजी झोले (वय ४९) यांचा मृत्यू, तुळसाबाई हिंमतराव सोनवणे (वय ७०) यांचा भवर टॉवरजवळ बसच्या धडकेने मृत्यू.
- जानेवारी २०२४ मध्ये सातपूर एमआयडीसीत सिटीलिंकने (एमएच १५ जीव्ही ७६९८) दुचाकीस्वार शिवाजी विश्वनाथ झोटे यांना चिरडले. जागीच मृत्यू
- १५ मे २०२५ रोजी सिटीलिंक बस के. के. वाघ कॉलेजजवळील दुभाजकावर जाऊन आदळली.
- ११ ऑगस्ट २०२५ रोजी सिटी सेंटर मॉलजवळ बसची कंटेनरला जोरदार धडक.
- १५ ऑगस्ट २०२५ रोजी पंचवटी हद्दीतील कोणार्कनगर येथे ‘सिटीलिंक’च्या धडकेने नितीन विष्णू ढगे (३५, रा. बेळगाव ढगा, त्र्यंबकरोड) यांचा मृत्यू,
- १ नोव्हेंबर २०२५ रोजी पंचवटीतील स्वामी नारायण चौकात सिटीलिकच्या धडकेत पादचारी बाळू सुकदेव अहिरे (वय ५०) हे ठार झाले.
धोकेदायक ‘सिटीलिंक’
- आतापर्यंत सिटीलिंकच्या अपघातात दहा जणाचा मृत्यू
- मागील तीन वर्षांत ४१ हुन अधिक अपघात
- ४० हून अधिक जखमी
- ताफ्यात एकूण २५० पेक्षा जास्त बसेस, ४७५ हून अधिक चालक
- अप्रशिक्षित चालकांच्या हाती ‘स्टेअरिंग’
- रेसर बाईकसारखी चालवितात बस
- अनेक बसेसच्या लाईट, ब्रेक लाईट, अप्पर, डिप्पर बंद
- बसचालकांत रिक्षाचालकांचा भरणा जास्त
- चालक फिट की अनफिट ठरविण्याची यंत्रणा नाही




