नाशिक । प्रतिनिधी | Nashik
यूपीए सरकारच्या (UPA Government) काळातील ‘जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना’ बंद करून मोदी सरकारने (Modi Government) त्याला ‘स्मार्ट सिटी’ असे नाव दिले. मात्र, स्मार्ट सिटीच्या नावाखाली नाशिक शहराचे (Nashik City) पूर्णपणे विद्रूपीकरण झाले असून, सरकारचे लक्ष केवळ ४० टक्के कमिशनवर केंद्रित असल्याचा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यातील महानगरांमध्ये ‘माझं हक्काचं शहर’ अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गत गुरुवारी (दि. २०) नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नाशिकमध्ये (Nashik) प्रवेश करतानाच अनुभव सांगताना चव्हाण म्हणाले, “समृद्धी महामार्गावरून बाहेर पडल्यानंतर ग्रामीण भागात तसेच नाशिक शहराच्या प्रवेशद्वारावरच रस्त्यांची बिकट अवस्था पाहायला मिळाली. शहरात योग्य दिशादर्शक फलक नाहीत आणि सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य आहे. नाशिक हे खड्ड्यांचे शहर बनल्याचे ऐकत होतो; मात्र, आज त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला, असे त्यांनी म्हटले. तर आमदारांच्या (MLA) पक्षांतरावर देखील त्यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केला. “आमदार खरेदी करण्यासाठी ५० कोटी रुपये येतात कुठून? नाशिककर आणि नागरिक खूप सोशिक झाले आहेत. सरकारने पक्षांतरबंदी कायदा धाब्यावर बसवून लोकशाहीची धिंडवडे उडवले आहेत. लोकशाही जिवंत राहते की नाही, अशी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे,” असे चव्हाण यांनी म्हटले.
‘जेन झी’ आणि तरुण शांत बसणार नाहीत
तरुणांच्या अलीकडील आंदोलनांचा (Protest) उल्लेख करत चव्हाण यांनी सरकारला इशारा दिला. “जेन झी आणि आजची नवी पिढी आता गप्प बसणार नाही. तरुण वर्ग अन्याय सहन करणार नाही. सरकार उत्तरे देणार नाही, पण तरुण ही उत्तरे मागितल्याशिवाय राहणार नाहीत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तसेच नाशिककरांना अन्यायाविरोधात जागे करण्यासाठीच ‘माझं हक्काचं शहर’ हे अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील मूलभूत प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था आणि पायाभूत सुविधांबाबत नागरिकांनी आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
नाशिकची ओळख आता ‘खड्ड्यांचे शहर’
आगामी सिंहस्थ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात (Nashik City) पायाभूत सुविधांची मोठी वानवा असून, शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नाशिकची ओळख आता ‘खड्ड्यांचे शहर’ अशी निर्माण झाली आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी आणि नाशिककरांच्या हक्कांसाठी नाशिककरांना खडबडून जागे करण्याची हीच वेळ आहे. यासाठी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या ‘हक्काचे शहर’ या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देखील चव्हाण यांनी केले.
नाव बदलवून भाजप सरकारने स्मार्ट सिटी योजना राबविली
चव्हाण पुढे म्हणाले की, नाशिक शहरात प्रवेश करतानाच रस्त्यांची दुरवस्था जाणवते. शहरात मूलभूत सुविधांची मोठी कमतरता असून नाशिक हे खड्ड्यांचे शहर झाले आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान योजनेचे नाव बदलवून भाजप सरकारने स्मार्ट सिटी योजना राबविली; मात्र विकासकामांपेक्षा टेंडर काढणे आणि त्यातून भ्रष्टाचाराला वाव मिळणे यालाच महत्त्व दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नवीन रस्त्यांची कामे काढायची, टक्केवारी घ्यायची आणि त्यातून राजकीय सौदेबाजी करायची, असा आरोप करत चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, यावेळी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांनी मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष निलेश खैरे यांनी प्रास्ताविकातून ‘हक्काचे शहर’ अभियानाची भूमिका स्पष्ट केली. या कार्यक्रमाला नाशिक जिल्हा काँग्रेस उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे, दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर, प्रदेश सचिव प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती जाधव, डॉ. दिनेश बच्छाव, माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, रईस शेख, लक्ष्मण धोत्रे, विजय राऊत, उद्धव पवार, किरण जाधव, संतोष ठाकूर, जयेश पोकळे, समाधान बागुल आदी पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुसूचित विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी केले, तर युवक काँग्रेस नेते स्वप्नील पाटील यांनी आभार मानले.




