नाशिक | Nashik
गेल्या काही दिवसांपासून तपोवनामध्ये सुमारे १,८०० हून अधिक वृक्षांच्या नियोजित कत्तलीविरोधात नाशिककर एकवटल्याचे बघायला मिळत आहे. त्यांना नाशिकच्या कलाकारांसह पर्यावरणप्रेमी, सामजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचा देखील पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे तपोवनातील झाडे वाचवण्यासाठी नाशिककरांसह इतर लोकही आक्रमकपणे संघर्ष करत असल्याचे दिसत आहे. तपोवनातील झाडांची कत्तल (Tree cutting) न करता राज्य सरकारने साधुग्राम(Sadhugram) उभारावे, अशी मागणी करण्यात येत आहे.वृक्षतोडीवरून सोशल मीडियाच्या माध्यमातून मंत्री आणि स्थानिक आमदारांवर टीका केली जात आहे.
हे देखील वाचा : Devendra Fadnavis : “झाडे तोडली नाही तर साधुग्राम…”; तपोवनातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री स्पष्टच बोलले, नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी वृक्षतोड टाळली पाहिजे याबद्दल कुणाचेही दुमत असू शकत नाही. फक्त या मुद्द्यावरुन जे राजकारण केले जात आहे. ते राजकीयकरण करणे चुकीचे आहे. कुंभमेळ्यासाठी साधूंना जागा दिली नाही तर कुंभमेळा कसा होईल. कुंभमेळा हा सनातन संस्कृतीचे प्रतिक आहे असे म्हणत वृक्ष तोडले नाही तर साधुग्राम कुठे करायचे ही अडचण आहे, असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) याबाबत एक्सवर (ट्विट) पोस्ट करत भाष्य केले आहे.
ते म्हणाले की, तपोवनातील वृक्षतोडीच्या (Tapovan Tree Cutting) संदर्भात समोपचारानं तोडगा काढला पाहिजे. यासंदर्भात अभिनेते श्री. सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे. पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहीलं, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, असे अजित पवारांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, तपोवनातील वृक्ष तोडू नये यासाठी आज (बुधवारी) नाशिकच्या (Nashik) काही चिमुकल्यांनी तोंडाला मास्क लावून झाडांना मिठी मारत ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ असे म्हणत झाडे वाचविण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे सरकार नाशिकच्या या चिमुकल्यांचे तरी म्हणणे ऐकेल का? असा सवाल सर्वसामान्य नाशिककर विचारत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
साधरणपणे वृक्षतोड टाळली पाहिजे याबद्दल कुणाचेही दुमत असू शकत नाही. फक्त या मुद्द्यावरुन जे राजकारण केले जात आहे. ते राजकीयकरण करणे चुकीचे आहे. साधुग्रामची ही जागा असून,कित्येक वर्षापासून आपण त्या ठिकाणी साधुग्राम तयार करत आहोत. आपण जर २०१५ आणि २०१६ ची गुगल इमेज बघितली तर त्या ठिकाणी कोणतीही झाडे नाहीत, २०१७-१८ ला महानगर पालिकेने एक प्रस्ताव घेतला. अतिक्रमण होत आहे त्यामुळे त्या ठिकाणी वृक्षारोपण केले पाहिजे, असा तो प्रस्ताव होता. आपलीही ५० कोटी वृक्षाची योजना सुरू होती. त्या अंतर्गत विचार न करता म्हणजे मी हे चूक आहे असं म्हणणार नाही, तिथे वृक्षारोपण केले आहे, म्हणून साहजिकच लोकांना वाटतंय आता ही झाडे का तोडता. पण महत्त्वाची अडचण ती वृक्ष तोडले नाही तर साधुग्राम कुठे करायचे ही अडचण आहे. प्रयागराजचा जो कुंभमेळा होतो तो १५ हजार हेक्टरमध्ये होतो आणि आपल्याला ३५० एकरमध्ये करायचा आहे. तिथली जमीन जर मिळाली नाही तर कुंभमेळा कसा होईल, कुंभमेळा हा सनातन संस्कृतीचे प्रतिक आहे, सनातन संस्कृतीमध्ये वृक्ष, पर्यावरण यांना एक विशेष महत्व दिलेले आहे. नदीला एक विशेष महत्व आहे. आपण नदीची आराधना करणारे लोक आहोत. एक प्रकारे कुंभमेळा करता आणि वृक्ष कसे तोडता हा समजही लोकांचा बरोबर आहे, त्यामुळे यातला मधला मार्ग काढावा लागणार आहे. जागा पण वापरता येईल पण जेवढे वृक्ष वाचवता येतील तेवढी वाचवता येतील. काही वृक्ष ट्रान्सप्लांट केली पाहिजे. मी प्रशासनाशी चर्चा केली, त्यांचही तेच मत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.




