नाशिक | Nashik
राज्य सरकारकडून १९ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी (Guardian Minister List) जाहीर करण्यात आली होती. मात्र, ही यादी जाहीर होताच महायुतीत (Mahayuti) नाराजीनाट्य दिसून आले होते. कारण नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन आणि रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
यानंतर या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली होती. यात पालकमंत्री न मिळाल्यामुळे नाशिक जिल्ह्याची (Nashik District) जिल्हा नियोजन समितीची बैठक (District Planning Committee Meeting) रखडली होती. त्यामुळे आमदारांची मतदारसंघातील विकासकामे रखडली होती. त्यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे दुपारी साडेतीन वाजता नाशिकच्या डीपीडीसीची बैठक घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, राज्याचा अर्थसंकल्प (Budget) उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार हे (दि.१० मार्च) रोजी विधानसभेत सादर करणार आहेत. त्यामुळे या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या विभागांच्या बैठका अजित पवार घेत आहेत. त्यामध्येच आज अजित पवार हे नाशिक जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार आहेत. या बैठकीला जिल्ह्यातील आमदार ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. तर शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) हे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून बैठकीला ऑनलाईन हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या बैठकीतून आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकसाठी काही घोषणा होतात का? याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत.
पालकमंत्रिपदाचा वाद अजूनही सुटेना
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरील गिरीश महाजनांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती देऊन दोन आठवडे उलटले असले तरी भाजपने नाशिकमधील पालकमंत्रिपदावरील दावा कायम ठेवला आहे. तर राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेने देखील नाशिकच्या पालकमंत्रिपदावर दावा केला आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदाचा पेच सुटण्याऐवजी वाढत असल्याचे दिसत आहे.