नाशिक | Nashik
मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीचा (Mahayuti) दणदणीत विजय झाला. यात भाजपने १३२, राष्ट्रवादी (अजित पवार) ४२ आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ५७ जागांवर विजय मिळविला. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) १५ पैकी तब्बल १४ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पुन्हा निवडून आले. तर एका जागेवर एमआयएमने (MIM) बाजी मारली. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिककरांचे आभार मानण्यासाठी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत.
याबाबतची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे. ते म्हणाले की,”शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे गुरुवार (दि.१३ फेब्रुवारी) रोजी नाशिककरांचे आभार मानण्यासाठी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या नियोजन संदर्भात नाशिकमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ९ फेब्रुवारीला वाढदिवस असून तो मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. तसेच १३ तारखेला एकनाथ शिंदेंची नाशिकमधे सभा देखील होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की,”नाशिकमध्ये (Nashik) पक्षात कोणतीही गटबाजी नसून सर्वजण एकत्र राहून एकजुटीने काम करत आहोत. मागील काही आठवड्यापासून नाशिकमधून अनेक माजी नगरसेवक शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करत असून पुढील काळात आणखी काही नगरसेवक प्रवेश करतील, असेही दादा भुसे यांनी म्हटले. तसेच यावेळी भुसेंनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, नुकताच काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा नाशिक दौरा पार पडला. यावेळी शाहांनी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे जाऊन भगवान त्र्यंबकराज आणि संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते, यावेळी शिंदे हे संपूर्ण दौऱ्यातच व्यस्त होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) येणार आहेत.