Thursday, November 5, 2026
HomeUncategorizedRohit Pawar : सिंहस्थ कामांत ७ ते ८ हजार कोटींचा भ्रष्टाचार; आमदार...

Rohit Pawar : सिंहस्थ कामांत ७ ते ८ हजार कोटींचा भ्रष्टाचार; आमदार रोहित पवारांचा पालकमंत्री महाजनांवर गंभीर आरोप

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण पार पडताच नाशिकमधील (Nashik) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सिंहस्थाच्या (Simhastha) नावाखाली प्रस्तावित ३५ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार सुरू असून, पालकमंत्री गिरीश महाजन आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी मिळून तब्बल ७ ते ८ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी केला आहे. लवकरच पुराव्यांसह मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा देत त्यांनी सत्ताधारी व प्रशासनाला लक्ष्य केले.

- Advertisement -

इतर कुंभमेळ्यांच्या तुलनेत ३५ हजार कोटींचा खर्च अवास्तव

नाशिकमध्ये (Nashik) पत्रकारांशी बोलताना रोहित पवार यांनी विविध कुंभमेळ्यांच्या खर्चाची आकडेवारी मांडली. ते म्हणाले, “२०१५ च्या नाशिक कुंभमेळ्यासाठी २,३७८ कोटी, २०१७ च्या उज्जैन कुंभमेळ्यासाठी ३,१८३ कोटी, २०१९ च्या प्रयागराज कुंभमेळ्यासाठी ४,२०० कोटी आणि २०२५ च्या प्रयागराज महाकुंभासाठी सुमारे ७,५०० कोटी रुपये खर्च झाले. मग नाशिक सिंहस्थासाठी ३५ हजार कोटींचा अवास्तव खर्च कशासाठी?” असा सवाल त्यांनी केला. तसेच चांगले रस्ते मुद्दाम उखडून पुन्हा निविदा काढल्या जात असल्याचा आणि निकृष्ट कामांमुळे १५ ते १६ जणांचा नाहक बळी गेल्याचा दावा त्यांनी केला.

माहिती लपवण्याचे आदेश आणि १० दिवसांचा अल्टीमेटम

विकासकामांच्या खर्चाची माहिती मिळवण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि कुंभमेळा आयुक्तांना पत्र दिले आहे. मात्र, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती न देण्याच्या सूचना दिल्याची माहिती त्यांनी दिली. प्रशासनाला १० दिवसांची मुदत देत माहिती उपलब्ध न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांचे कारनामे आणि बेनामी संपत्तीचे पुरावे टप्प्याटप्प्याने जाहीर करण्याचा इशारा पवारांनी दिला.

झाडे तोडून हॉटेल अन् नोएडात महालाचे बांधकाम?

सीएसआर निधीतून लावलेली झाडे तोडून तेथे संबंधित अधिकाऱ्याने स्वतःचे हॉटेल सुरू केल्याचा आरोप पवारांनी केला. तसेच नोएडामध्ये कोट्यवधी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या महालासाठी कुंभमेळ्याचा निधी वळवण्यात आला आहे का, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. जळगावमधील मर्जीतील अधिकाऱ्यांना नाशिकमध्ये आणून नियमबाह्य कामे दिली जात असल्याचा ‘जळगाव पॅटर्न’ राबवला जात असल्याचेही ते म्हणाले.

गोदावरी प्रदूषण आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला २० दिवसांची मुदत

औद्योगिक कंपन्यांकडून रासायनिक सांडपाणी गोदावरीत सोडले जात असून एमआयडीसी परिसरातील पाण्यात ‘क्रोमियम’ हे घातक रसायन आढळल्याचा दावा त्यांनी केला. प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारवाईसाठी २० दिवसांची मुदत देत अन्यथा तीव्र परिणामांना सामोरे जाण्याचा इशारा दिला.

बिल्डर लॉबी आणि अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी रिंग रोडचे डिझाइन बदलले

साडेआठ ते नऊ हजार कोटी रुपयांच्या रिंग रोडचा फायदा भाविकांपेक्षा बिल्डर लॉबीला अधिक होत असून, या मार्गावर ७ ते ८ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जमिनी असल्याचा दावा त्यांनी केला. एका स्थानिक बिल्डरच्या टाऊनशिपला फायदा पोहोचवण्यासाठी रस्त्याचे डिझाइन बदलल्याचा आरोप त्यांनी केला.

दिवाळीनंतर पुराव्यांसह पुन्हा नाशिकला येणार!

सिंहस्थातील कथित भ्रष्टाचार आणि गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा सोडणार नसल्याचे स्पष्ट करत, दिवाळीनंतर पुन्हा नाशिकला येऊन अधिक पुराव्यांसह या प्रकरणांचा पाठपुरावा करणार असल्याचा निर्धार रोहित पवार यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

Balasaheb Thorat : महाराष्ट्रातील सहकार मोडण्याचे पाप मुख्यमंत्र्यांनी करू नये –...

0
नाशिक । प्रतिनिधी | Nashik गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर सत्ता बळकावण्यासाठी राज्य सरकारकडून पाच नामनिर्देशित संचालक वाढविण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे....