पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbhmela) पार्श्वभूमीवर पंचवटीतील गोदाघाट परिसरात (Godaghat Area) सध्या कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामे सुरू आहेत. भाविक आणि पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असा ‘रामकाल पथ’ देखील येथे निर्माण केला जात आहे. मात्र, एकीकडे कोट्यवधींच्या विकासकामांचा गाजावाजा होत असताना, दुसरीकडे याच परिसरात वस्त्रांतराच्या (कपडे बदलण्याच्या) नावाखाली महिला भाविकांची सर्रास आर्थिक लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पंचवटी विभागीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाचे याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आता परिसरात रंगली आहे.
सध्या अधिक मास सुरू असल्याने पवित्र गोदावरी नदीत (Godavari River) स्नानासाठी देशभरातून आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भक्त आणि भाविक पंचवटीत दाखल होत आहेत. गोदाघाटावर दररोज स्नानासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे.गोदाघाटावर प्रशासनाने पुरेशा प्रमाणात महिलांसाठी कपडे बदलण्याची (वस्त्रांतर) व्यवस्था करणे गरजेचे होते. मात्र, याच शासकीय त्रुटीचा गैरफायदा एका अतिक्रमित हातगाडी चालकाने घेतला आहे. या चालकाने गोदाघाट परिसरात चक्क स्वतःचा ‘खाजगी वस्त्रांतर कक्ष’ थाटला आहे. नदीपात्रात स्नान करून येणाऱ्या महिला भाविकांना कपडे बदलण्यासाठी दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने, त्यांना नाईलाजाने या कक्षाचा वापर करावा लागत आहे.
याचाच फायदा उठवत हा चालक प्रत्येक महिलेकडून वस्त्रांतरासाठी (Changing Clothes) तब्बल २० रुपये वसूल करत आहे. ज्या गोदाघाटावर पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक आणि स्वच्छता निरीक्षक सातत्याने फिरतीवर असतात, त्याच ठिकाणी हा बेकायदेशीर वसुलीचा धंदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर कसा सुरू राहू शकतो? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. स्थानिक नागरिक आणि भाविकांमधून व्यक्त होत असलेल्या माहितीनुसार, पंचवटी विभागीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाच्या डोळ्यांदेखत हा प्रकार सुरू असून, यामागे काही ‘अर्थपूर्ण’ तडजोडी झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मानपाचे अधिकृत वस्त्रांतरगृह दिसेनासे; कर्मचाऱ्यांसमोरच लूट!
गोदाघाट परिसरात मनपा प्रशासनाकडून महिला भाविकांसाठी अधिकृत वस्त्रांतरगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, योग्य दिशादर्शक फलक नसल्याने किंवा हे गृह दूर असल्याने ते भाविकांना दिसेनासे झाले आहे. याच अज्ञानाचा गैरफायदा खाजगी व्यावसायिक घेत आहेत. विशेष म्हणजे, महापालिकेचे स्वच्छता आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी याच परिसरात तैनात असताना, त्यांच्या डोळ्यांदेखत हा वसुलीचा प्रकार सुरू असल्याने नागरिकांमधून तीव्र आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.
नवनियुक्त विभागीय अधिकाऱ्यांचा वचक शून्य; कर्मचाऱ्यांकडून माहिती लपवण्याचा खेळ!
पंचवटी प्रभागाला लाभलेल्या नवनियुक्त विभागीय अधिकाऱ्यांचा प्रभाग परिसरावर आणि स्वतःच्या मनपा कर्मचाऱ्यांवर कोणताही वचक नसल्याचे चित्र आहे. अधिकारी नवीन असल्याचा गैरफायदा घेत कर्मचारी गोदाघाटावरील अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचूच देत नसल्याचे उघड झाले आहे. परिसरात काय चालले आहे याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात असल्याने, नवीन अधिकाऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत अतिक्रमण विभाग आणि खाजगी वसुली बहाद्दरांचे चांगलेच फावले आहे. अधिकाऱ्यांनी या ढिसाळ कारभारावर तात्काळ चाप लावावा, अशी मागणी होत आहे.




