नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सायबर गुन्ह्यांमध्ये (Cyber Crime) आरोपींना शिक्षा घडवून आणण्यासाठी न्यायालयात सादर केले जाणारे डिजिटल व फॉरेन्सिक पुरावे किती विश्वासार्ह आणि अचूक आहेत, यावर संपूर्ण खटल्याचा निकाल अवलंबून असतो. याच पार्श्वभूमीवर राज्यातील (State) सर्व न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांना एनएबीएल अर्थात नॅशनल अॅक्रिडेशन बाेर्ड फाॅर टेस्टिंक अँन्ड कॅलिब्रेशन लॅबाेरेटरीजचे राष्ट्रीय मानकीकरण प्राप्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नाशिकसह राज्यातील सर्व प्रादेशिक फॉरेन्सिक प्रयोगशाळांना एक वर्षाच्या आत, तर लघु प्रयोगशाळांना दाेन वर्षांच्या आत हे मानांकन मिळवणे बंधनकारक आहे. एनएबीएल ही भारत सरकारच्या (Government) अंतर्गत काम करणारी एक सर्वोच्च स्वायत्त संस्था आहे. कोणतीही प्रयोगशाळा वैज्ञानिक निकष, तंत्रज्ञान, गुणवत्तेचे मानक (आयएसओ/ आयईसी स्टँन्डर्ड) आणि तज्ज्ञ कर्मचाऱ्यांच्या निपुणतेवर तंतोतंत खरी उतरते का, याचे कठोर ऑडिट करून हे प्रमाणपत्र दिले जाते.
फॉरेन्सिक प्रयोगशाळांमध्ये या मानांकनाचे निकष पूर्ण करण्यासाठी वैज्ञानिक अधिकारी व सहायकांची पुरेशी संख्या असणे आवश्यक असते. म्हणूनच शासनाने १३० वैज्ञानिक अधिकारी आणि ९० वैज्ञानिक सहायकांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे केवळ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद होणार नाही, तर मानांकन मिळवण्यासाठी आवश्यक असलेला तांत्रिक दर्जा आणि मनुष्यबळ प्रयोगशाळांना त्वरित उपलब्ध होणार आहे.
फॉरेन्सिक लॅबसाठी या मानांकनाचे ३ फायदे
१. न्यायालयात पुरावा नाकारता येणार नाही
बऱ्याचदा बचाव पक्षाचे वकील फॉरेन्सिक लॅबच्या चाचणी पद्धतींवर किंवा उपकरणांच्या अचूकतेवर शंका उपस्थित करून डिजिटल पुराव्यांची वैधता आव्हानित करतात. परंतु, प्रयोगशाळा एनएबीएल मान्यताप्राप्त असल्यास त्या लॅबचा तपास अहवाल आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अचूक मानला जातो आणि न्यायालयात त्याला कायदेशीरदृष्ट्या अधिक वजन प्राप्त होते.
२. मानवी चुका आणि त्रुटींना विराम
या मानांकनामुळे संगणकीय व सायबर गुन्ह्यांमधील डेटा रिकव्हरी, व्हॉईस सॅम्पल मॅचिंग आणि तांत्रिक पुराव्यांच्या तपासणीत गुणवत्तेचे १०० टक्के पालन करावे लागते. यामुळे मानवी चुका किंवा उपकरणांतील त्रुटींमुळे पुरावे खराब होण्याचा धोका टळतो.
३. आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता
आंतरराष्ट्रीय स्तरावर धागेदोर असलेल्या सायबर गुन्ह्यांमध्ये या प्रमाणित फॉरेन्सिक लॅबचा अहवाल जागतिक तपासात व परदेशी यंत्रणांसमोरही वैध ठरतो.




