Sunday, April 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा साठा किती? जिल्हाधिकारी प्रसाद यांनी महत्वाची माहिती...

Nashik News : जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा साठा किती? जिल्हाधिकारी प्रसाद यांनी महत्वाची माहिती देत नागरिकांना केलं ‘हे’ आवाहन

नाशिक | Nashik

जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा इंधन तुटवडा नसून पेट्रोल व डिझेलचा (Petrol and Diesel) पुरेसा साठा उपलब्ध आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून नियमित व अखंडित पुरवठा सुरू आहे. त्यामुळे इंधनाचा तुटवडा असल्याबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकाना केले आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी प्रसाद (Collector Aayush Prasad) यांनी सांगितले की, सध्या काही ठिकाणी सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपांवर गर्दी करत आहेत. गरजेपेक्षा जास्त प्रमाणात इंधन खरेदी (पॅनिक बायिंग) केल्यामुळे काही पंपांवर तात्पुरत्या स्वरूपात इंधन संपल्याचे चित्र निर्माण होत आहे. मात्र, ही परिस्थिती केवळ तात्पुरती व कृत्रिम असून प्रत्यक्षात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांना ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून सातत्याने इंधनाचा पुरवठा होत आहे. नवीन इंधनाचा पुरवठा नियमितपणे पोहोचत असल्याने नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी जबाबदारीने व संयमाने वर्तन करणे अत्यंत आवश्यक आहे. गरज नसताना इंधन साठवून ठेवणे टाळावे, तसेच पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये. पॅनिक बायिंगमुळे इतर नागरिकांना त्रास होऊ शकतो व पुरवठा व्यवस्थेवर अनावश्यक ताण येऊ शकतो, याची जाणीव सुजाण नागरिकांनी ठेवावी. जिल्हा प्रशासनाकडून इंधन पुरवठ्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.

तसेच, नागरिकांना (Citizen) कोणतीही शंका, अडचण किंवा तक्रार असल्यास संबंधित ऑईल मार्केटिंग कंपनी अथवा जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाशी संपर्क साधावा. अधिकृत माहितीसाठी केवळ शासकीय माध्यमांवर विश्वास ठेवावा. असेही त्यांनी सांगितले. अफवांवर विश्वास ठेवणे टाळून, जबाबदार नागरिक म्हणून प्रशासनाला सहकार्य करणे ही काळाची गरज असल्याचे सांगत जिल्हाधिकारी प्रसाद यांनी नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्या

राजकारण : आता मात्र हद्द झाली!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक खरातपाठोपाठ पत्रकार रवींद्र एरंडे याच्या लैंगिक शोषणाच्या भानगडी बाहेर आल्याने नाशिकच्या बदनामीत भर पडली आहे. या...