नाशिक | Nashik
येथील मराठा विद्या प्रसारक समाज (MVP) संस्थेतर्फे रविवार दि.१२ जानेवारी रोजी पार पडलेल्या ९ व्या राष्ट्रीय व १४ व्या राज्यस्तरीय ‘नाशिक मविप्र मॅरेथॉन २०२५’ (MVP Marathon-2025) स्पर्धेतील फूल मॅरेथॉनचे (४२.१९५ किमी) विजेतेपद मुंबईच्या डॉ. कार्तिक जयराज करकेरा (Dr. Karthik Karkera) याने पटकावले. विशेष म्हणजे कार्तिकने २ तास २० मिनिटे या विक्रमी वेळेत स्पर्धा पूर्ण करून नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सन २०१८ मध्ये झालेल्या नाशिक मविप्र मॅरेथॉनमध्ये करणसिंग (हरियाणा) याने २ तास २२ मिनिटे ३३ सेकंदात फूल मॅरेथॉन पूर्ण केली होती. हा विक्रमही यंदाच्या स्पर्धेत मोडीत निघाला.
कडाक्याच्या थंडीत (Cold) रविवारी (दि.१२) पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांनी स्पर्धेला सुरवात झाली. कडाक्याच्या थंडीतही धावपटूंचा उत्साह ओसंडून वाहत होता. वेगवेगळ्या १४ गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत चिमुकल्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत तब्बल चार हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदविला. ४२.१९५ किलोमीटर फूल मॅरेथॉनने स्पर्धेला सुरवात झाली. भारतीय हॉकी संघातील खेळाडू तथा रियो ऑलिम्पिकपटू रेणुका यादव, आयोजन समितीचे अध्यक्ष व मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड, ॲड. लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे, ॲड. आर. के. बच्छाव, ॲड. संदीप गुळवे, शिवाजी गडाख, प्रवीण जाधव, विजय पगार, शालनताई सोनवणे, शोभाताई बोरस्ते, सेवक संचालक डॉ. एस. के. शिंदे, प्रा. सी. डी. शिंदे, जगन्नाथ निंबाळकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवत स्पर्धेला सुरवात करण्यात आली.
फूल मॅरेथॉनमध्ये (Flower Marathon) धावताना डॉ. कार्तिकने २ तास २० मिनिटे अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांकासह मॅरेथॉनचे एक लाख ५१ हजार रूपयांचे पारितोषिक पटकावले. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील सिकंदर चिंधू तडाखे या धावपटूने २ तास २० मिनिटे २ सेकंद अशी वेळ नोंदवत दुसऱ्या क्रमांकाचे एक लाखाचे तर महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील विक्रम भरतसिंह बंगरिया या धावपटूने २ तास २० मिनिटे १२ सेकंद अशी वेळ नोंदवत तृतीय क्रमांकाचे ७५ हजारांचे पारितोषिक पटकावले.
स्पर्धेसाठी देशभरातून उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मेघालय तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील धावपटू असे एकूण साडेतीन हजारांपेक्षाही जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे फूल मॅरेथॉनमधील पहिले तिन्ही धावपटू हे महाराष्ट्रातील आहेत. तसेच, नाशिकच्या सिकंदर तडाखे याने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दुसरा क्रमांक कायम ठेवत मागील वर्षीपेक्षा यंदा सहा मिनिटे २१ सेकंद आधी स्पर्धा पूर्ण करून स्वतःचाच विक्रम मोडला आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून त्यांचा उत्साह वाढविला. तर रावसाहेब थोरात सभागृह परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाने रंगत वाढवली होती.
दरम्यान, बक्षीस वितरण समारंभ कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात पार पडला. यावेळी विविध १४ गटांतील विजेत्यांसह सहभागी धावपटूंना मान्यवरांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी एकूण ८ लाख ५८ हजार रुपये रकमेच्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी आयोजन समितीचे अध्यक्ष व मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी सांगितले की, मविप्र मॅरेथॉन स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अत्यंत सूक्ष्म व काटेकोर नियोजन केलेले होते. धावणमार्ग मापनापासून ते स्पर्धा पूर्ण होईपर्यंत प्रत्येकाने आपापली जबाबदारी सक्षमपणे पार पाडल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी विदेशातील धावपटूंनीही नोंदणीसाठी संपर्क साधला होता. मात्र कायदेशीर कारणांमुळे त्यांना सहभाग घेता आला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याकरिता सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे त्यांनी म्हटले.
‘फन रन’ने वेधले लक्ष
यंदाच्या स्पर्धेत वेगवेगळ्या थिमवर आधारित ‘फन रन’ने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यामध्ये पर्यावरण रक्षण, बेटी बचाव-बेटी पढाव, स्वच्छ भारत अभियान, पाणी वाचवा, झाडे लावा-झाडे जगवा, महिला सक्षमीकरण, निरोगी आरोग्य, योग, जागर शिक्षणाचा या सामाजिक विषयांवर जनजागृतीपर फलक हाती घेऊन स्पर्धक सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
गटनिहाय प्रथम क्रमांकाचे विजेते (एकूण सहभागी कंसात)
१) ४२.१९५ किमी : डॉ. कार्तिक जयराज करकेरा-मुंबई (६४ )
२) २१ किमी : हरिश शेरॉन-हरयाणा (१०६)
३) १० किमी महिला खुला वर्ग : ज्योती मनोहर सरोज- नाशिक (५०)
४) १० किमी पुरुष खुला गट : अतुल शांताराम बर्डे- नाशिक (२३९)
५) १२ किमी – २५ वर्षाआतील मुले : कार्तिककुमार चाम्रुजी कारीहारपाल – नाशिक (२०९)
६) ०६ किमी – २५ वर्षाआतील मुली : पूजा प्रभाकर पारधी- नाशिक(१६८)
७) १० किमी – १९ वर्षाआतील मुले : ऋषिकेश विठोबा वावरे-नाशिक (२३०)
८) ५ किमी – १९ वर्षाआतील मुली : पूनम विष्णू शेवरे – नाशिक (१३१)
९) ५ किमी – १७ वर्षाआतील मुले : कुणाल लक्ष्मण ब्राह्मणे-नाशिक (६०२)
१०) ४ किमी – १७ वर्षाआतील मुली : रिद्धीमा नरेश मेहता-नाशिक (३६४)
११) ४ किमी – १४ वर्षाआतील मुले : चैतन्य कृष्णा श्रीखंडे- छत्रपती संभाजी नगर (४८२)
१२) ३ किमी – १४ वर्षाआतील मुली : श्वेता विजय सदगीर – नाशिक (३३०)
१३) ४ किमी – ६० वर्षावरील पुरुष : केशव माणिकराव मोटे- नाशिक (५०)
१४) ५ किमी – ३५ वर्षावरील महिला : डॉ. ऋषिका भारतकुमार पटेल-नाशिक (५५)
१५) २ किमी – ओपन फन रन : ३६४ (ही स्पर्धा आरोग्य व सामाजिक विषयांवर होती)