नाशिक | Nashik
सुट्टी निमित्त कश्यपी धरणावर (Kashyapi Dam) फिरण्यासाठी गेलेल्या मुळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील रहिवासी असलेले आणि सध्या नाशिकच्या मखमलाबाद येथे वास्तव्यास असलेल्या पती-पत्नीसह चौघांचा कश्यपी धरणात (Dam) बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. सदर घटनेत सचिन ठोंबरे व रोहिणी ठोंबरे या पती-पत्नीसह मखमलाबाद येथील दोन मुलांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर ठोंबरे दाम्पत्याची दोन वर्षांची मुलगी सुदैवाने बचावली आहे.
मुळचे संगमनेर येथील रहिवासी आणि सध्या मखमलाबाद येथे राहत असलेले सचिन कैलास ठोंबरे हे पत्नी व शेजारी राहणार्या दोन मुलांसह कश्यपी धरणावर गेले होते. त्यांच्याबरोबर केतन अनिल पवार (१६) व कौशल्य अनिल पवार (१४) ही शेजारची दोन मुले होती. सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास हे सर्व अंघोळीसाठी धरणात उतरले. मात्र, खोलीचा अंदाज न आल्याने एक जण बुडायला लागला. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात या चौघांचा (Four) कश्यपी धरणात बुडून मृत्यू झाला.
यावेळी धरणाजवळ दोन वर्षाचे लहान बाळ पाण्यात जात असल्याचे पाहून संगीता घाडगे या महिलेने पाण्यात धावत जाऊन त्या बाळाला वाचवले. त्यानंतर या बाळाने रडत मम्मी पप्पा असे म्हणत बोट पाण्याकडे (Water) दाखविले. त्यानंतर सदर महिलेने आरडाओरड करून घटनेची माहिती धरणालगतच्या नागरिकांना दिली. खाड्याच्या वाडी धरणालगतच गावातील कुस्ती स्पर्धा चालू होती.
त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच उपस्थित तरुणांनी खोल पाण्यात उड्या घेऊन बुडणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला. त्यांनी चौघांनाही पाण्याबाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. मृत महिलेच्या मोबाईलवर आलेल्या कॉलवरून मृतांची (Dead Body) ओळख पटली. त्यानंतर नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला.
दोन वर्षांच्या मुलीमुळे कळली दुर्घटना
दोन वर्षांची मुलगी धरणाजवळ एकटेच बुडत असल्याचे दिसल्यानंतर काही दुर्घटना घडल्याची शंका आली. ही मुलगी वारंवार पाण्यामध्ये जात असल्याचे बघून एका महिलेने पाण्यात उडी घेत या मुलीला पाण्याबाहेर आणले. मात्र ती मुलगी रडत रडत आई-बाबा म्हणत पाण्याकडे हात दाखवित होती. त्यामुळे येथे कोणीतरी बुडाले असल्याचा संशय या महिलेला आला. त्यानंतर स्थानिक नागरिकांना पाचारण केले.




