नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्हा शासकीय रुग्णालयातील (District Government Hospital) खासगी सुपरवायझरने कटलरी व्यावसायिकाच्या मुलास सिव्हिलमध्ये नोकरी (Job) लावून देण्याचे आमिष दाखवून ७६ हजारांचा गंडा घातला आहे. फोन पे द्वारे संशयिताने (Suspect) हे पैसे उकळले असून सध्या प्रतिक रामेश्वर राऊते (रा. एकतानगर, बोरगड, म्हसरुळ) हा संशयित पसार झाला आहे. पंचवटी पोलीस त्याचा शोध घेत आहे.
सुनिल प्रभाकर भावसार (वय ५२, रा. गणेशवाडी, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार त्यांची ओळख सुपरवायझर प्रतिक राऊते याच्याशी झाली होती. यानंतर प्रतिकने भावसार यांच्या मुलास जिल्हा रुग्णालयात नोकरी लावून देतो, त्यासाठी टेबलांवर पैसे द्यावे लागतील असे सांगितले. मुलास सरकारी नोकरी किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसेसवरील नोकरी मिळत असल्याने, भावसार यांचा विश्वास बसला. त्यांनी संशयित राऊते याने सांगितल्यानुसार व्यवहार (Transactions) फिक्स केला.
त्यानंतर जून ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत प्रतिक याने आपल्या फोन पेवर आणि रोख स्वरुपात भावसार यांच्याकडून एकूण ७६ हजार ३८० रुपये क्रेडिट करुन घेतले. मात्र, अनेक महिने उलटूनही नोकरी किंवा ज्वॉइनिंग लेटर न मिळाल्याने भावसार यांना संशय आला. त्यांनी प्रतिकला संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही. याबाबत पंचवटी पोलीसांत फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला असून तपास उपनिरीक्षक कैलास जाधव करत आहेत. याच संदर्भाने कुणाची फसवणूक (Fraud) झाली असल्यास, पंचवटी पोलिसांशी संपर्क साधावा.
एजंटकडून फसवणूक
प्लॉटचे खरेदीखत करून देण्याचे सांगून नरेंद्र सदाशिव सोनार (रा. चेतनानगर) यांची संशयित चंदन विजय कुवर याने १४ लाख रुपये उकळून गंडा घातला. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सन २०१८ मध्ये सिटी सेंटर मॉलनजिकच्या कालिका पार्कमध्ये घडली. चंदन याने सोनार यांना प्लॉटचे खरेदीखत करून देण्यासाठी १५ लाख रुपये घेतले. कालांतराने त्याने ९८ हजार रुपये सोनार यांना फोन पे करुन उर्वरित १४ लाख २ हजार रुपये न देता गंडा घातला.
व्यावसायिकासही गंडा
ह्यूमन रिसोर्स, बँकिंगची प्रॅन्चायसीची जाहिरात सोशल मिडियावर पाहताच एका व्यावसायिकाने प्रॅन्चायसी घेण्यासाठी प्रयत्न केले आणि १५ लाख रुपये गमावले. संदिप सत्येंद्र रॉय (रा. श्रीरामनगर, इंदिरानगर, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित पुनित शर्मा (रा. कोहीनूर कमर्शिअल फेज १, कुर्ला मुंबई), रिचा भद्रा, आदित्य मुकूल माथूर, विवेक गुप्ता व जतिन यांनी रॉय यांना जानेवारी ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान संपर्क साधला आणि फॅन्चायसी देण्याच्या मोबदल्यात विविध बँक खात्यांवर टप्प्याटप्प्याने १५ लाख रुपये भरण्यास सांगितले. ते भरुनही काहीच कार्यवाही न झाल्याने रॉय यांनी इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून फसवणुकीची फिर्याद नोंदविली. तपास उपनिक्षक चौधरी करत आहेत.
खात्यातून पैसे लांबविले
बँक व्यवहाराशी निगडित समस्या सांगून सायबर चोरट्याने एका बँक खातेदाराचा ओटीपी मिळविल्यानंतर परस्पर ९२ हजार रुपये वर्ग करून ऑनलाइन फसवणू क केली आहे. भाऊसाहेब दत्तू कड (रा. सरोदे संकुल, कामटवाडे) यांनी याबाबत चुंचाळे पोलीस चौकीत संशयित चोरटा रवि मिश्रा व त्याच्याकडील मोबाईल क्रमांकधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कड हे एमआयडीसीतील लुसी कंपनीत असताना त्यांना मिश्रा याने १० डिसेंबर रोजी कॉल करून बँक खात्याबाबत क्युरी सांगितली. ती सुरळीत करुन देण्यासाठी काही स्टेप्स फॉलो करण्यास भाग पाडले. बँक खात्याची माहिती मिळताच संशयिताने त्यांना ओटीपी पाठविला. हा ओटीपी विचारल्यानंतर कड यांनी सांगताच, त्यांच्या क्रेडीट कार्डच्या खात्यातून ९२ हजार रुपये परस्पर दुसरीकडे वर्ग झाले.