नांदगाव | वार्ताहर | Nandgaon
उत्तर महाराष्ट्रातील (Uttar Maharashtra) सर्वाधिक साठवण क्षमता असलेले आणि नांदगाव, मालेगांव तालुक्यांसह जळगाव जिल्ह्याला वरदान ठरणारे गिरणा धरण (Girna Dam) ९६ टक्के भरले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणाचा गेट क्रमांक १\६ प्रत्येक ६० सेंटिमीटर सुमारे (दोन फूट) तर गेट क्रमांक २,३,४,५ प्रत्येकी ३० सेंटिमीटर (एक फूट) उघडण्यात आली असून, गिरणा नदीपात्रात ९, ७६९ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
गिरणा धरणातील पाण्याच्या (Water) आवकेनुसार विसर्गाचे प्रमाण कमी-अधिक केले जाईल. त्यामुळे पूर स्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याने गिरणा काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गिरणा धरण क्षेत्रात परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठ्यात जलद वाढ झाली आहे. धरणाची एकूण क्षमता २१ हजार ५०० द.ल.घ. फूट आहे.
गिरणा धरणातून नियमित होणाऱ्या आवर्तनामुळे मालेगाव, नांदगाव ,चाळीसगाव, भडगाव ,पाचोरा अमळनेर, धरणगाव या भागातील सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार विसर्गात आवश्यक ती वाढ- कपात करण्याचा निर्णय वेळोवेळी घेतल्या जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या (Irrigation Department) वतीने सांगण्यात आले आहे.
गिरणा नदीपात्रात (Girna Riverbed) ९ हजार ७६९ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. पाण्याची आवक बघता विसर्ग कमी-जास्त करण्यात येईल. त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये तसेच जनावरे नदीजवळ नेऊ नयेत, असे आवाहन गिरणा पाटबंधारे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गिरणा धरणावर थेट पाणी पुरवठा योजनामध्ये मालेगाव, चाळीसगाव, नांदगाव शहरासह दहिवाळ व २५ गावे जोडली गेली आहेत. याशिवाय जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १५४ ग्रामपंचायती पिण्याच्या पाण्यासाठी गिरणा धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या भागातील सिंचनासह पिण्याच्या पाण्याची तहान भागविणारे म्हणून गिरणा धरण ओळखले जाते.
दरम्यान, धरणात (Dam) यंदा लवकर पाणीसाठा वाढला असून नजिकच्या काळात पूर्ण क्षमतेने भरण्याच्या शक्यतेने नांदगाव मालेगावसह विशेषतः जळगाव जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. गिरणा धरणावर अवलंबून असणाऱ्या पाणीपुरवठा योजना जिवंत झाल्याने परिसरातील सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.




