नाशिक | Nashik
युवकांनी आधुनिक विज्ञानाचे शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासोबत प्राचीन ज्ञानापासून प्रेरणा घेत नव भारत घडवावा, असे आवाहन राज्यपाल जिष्णू देव वर्मा (Governor Jishnu Dev Varma) यांनी केले. महर्षि गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान नाशिक आयोजित चतुर्वेद संमेलन तथा राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, वेदाचार्य रवींद्र पैठणे, प्रतिष्ठानचे संस्थापक, ब्रह्मर्षी पंडित शिवकुमार शर्मा, हरिद्वार येथील उत्तराखंड संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रमाकांत पांडे, केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नाशिक परिसराचे संचालक डॉ. नीलाभ तिवारी, धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार स्वागत समितीचे अध्यक्ष प्रा. जयंत भातांबरेकर, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव दीप्ती देशपांडे आदी उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल वर्मा म्हणाले, युवकांनी (Youth) आपली संस्कृती समजून घेण्यासोबतच जागतिक दर्जाचे शिक्षण घ्यावे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० या दिशेने एक महत्त्वाची संधी उपलब्ध करून देते. आधुनिक विज्ञान आणि प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरा यांचा समन्वय भारताला अधिक सामर्थ्यवान बनवू शकतो. महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान समर्पण भावाने वेदपरंपरेच्या संरक्षण व संवर्धनाचे कार्य करीत आहे. हे कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे. ही संस्था युवकांना आपल्या मुळांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात हे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रतिष्ठानने राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांसोबत (College) काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्यपाल पुढे म्हणाले, नाशिक (Nashik) हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर भारताच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ज्ञानपरंपरेचे एक महत्त्वपूर्ण केंद्र राहिले आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा परिसर येथे स्थापित होणे ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. राज्यातील विद्यार्थी, संशोधक, संस्कृतचे अभ्यासक तसेच भारतीय ज्ञानपरंपरेच्या साधकांनी या केंद्राचा लाभ घ्यावा. आगामी काळात नाशिक हे वैदिक आणि संस्कृत अध्ययनाचे एक प्रमुख राष्ट्रीय केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वेद ही केवळ आपली परंपरा नाही, तर ते आपल्या भविष्यातील सामर्थ्यही ठरू शकतात. त्यासाठी आपल्याला वेदांचे संरक्षण, त्यांच्यावर संशोधन आणि अधुनिकतेसंदर्भात अभ्यास आणि वेदांचे ज्ञान व मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असेही वर्मा म्हणाले.
वेद आणि भारतीय ज्ञानपरंपरेची ओळख आपल्या शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना (Student) करून दिली पाहिजे. आधुनिकता आत्मसात करणारे युवक घडवितानाच ते आपल्या संस्कृतीशी जोडलेले असतील हेदेखील पहावयाचे आहे. वेद, उपनिषदे, भगवद्गीता, रामायण, महाभारत, संत साहित्य आणि भारतीय दर्शनातील मूलभूत विचार विद्यार्थ्यांपर्यंत सुलभ आणि आधुनिक माध्यमातून पोहोचविले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्काराने सन्मानित व्यक्तींना प्रदान करण्यात आलेले पुरस्कार केवळ विद्वत्तेचा सन्मान नाही तर, मानवतेला सत्य, धर्म, कर्तव्य आणि विश्वकल्याणाचा मार्ग दाखविणाऱ्या भारताच्या महान ज्ञानपरंपरेचा हा सन्मान आहे. वेद हे केवळ प्राचीन ग्रंथ नाहीत, तर ते भारताच्या ज्ञानचेतनेचे मूलस्रोत आहेत. आचार्य आणि विद्वानांनी मौखिक परंपरेच्या माध्यमातून वेदांचे जतन केले आहे. वेदांमध्ये निसर्ग आहे, विज्ञान आहे, तत्त्वज्ञान आहे, अध्यात्म आहे, जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आहे आणि संपूर्ण मानवतेच्या कल्याणाची मंगलकामना आहे, असेही राज्यपालांनी म्हटले.
तसेच निलभ तिवारी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाचे नाशिक येथे केंद्र सुरु होत असून यासाठी राज्य शासनाने जमीनही उपलब्ध करुन दिली आहे. या केंद्रामुळे नाशिकमधून वेदाच्या अभ्यासाची नवी पिढी निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर कुलगुरू पांण्डेय यांनी आपल्या मनोगतात नाशिक ही धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक नगरी असून नाशिकचे महात्म्य लक्षात घेऊन याठिकाणी संस्कृत विद्यापीठाचे केंद्र सुरु होत असल्याचे सांगितले. संस्कृत विद्यापीठामुळे ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालून वेदशास्त्राचा प्रचार व प्रसारासाठी नवी पिढी पुढे येण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले. याशिवाय प्रतिष्ठानचे सचिव वेदार्चा रवींद्र पैठणे यांनी विद्यापीठाच्या गेल्या २५ वर्षाच्या वाटचालीचा आढावा सादर केला. राज्यपालांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास पुरस्कार समितीचे विश्वास ठाकूर, वैभव जोशी, दिपक बागड, योगाचार्य डॉ. विश्वास देवकर, डॉ. कुमार भट्ट, रामगोपाल अय्यर यांचेसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, नागरीक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांचा झाला सन्मान
वेदाचार्य संतोष कुमार धनपाठी, हैद्राबाद यांना स्वर्गीय धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय ऋगवेद पुरस्कार, वेदाचार्य महेश रेखे धनपाठी, अहिल्यानगर यांना स्वर्गीय धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय शुक्ल यजुर्वेद पुरस्कार, वेदाचार्य श्रीकृष्ण श्रौती गुरुजी, चेन्नई यांना स्वर्गीय धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय सामवेद पुरस्कार, वेदाचार्य रामचंद्र जोशी, तिरुपती यांना स्वर्गीय धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय अथर्ववेद पुरस्कार, वेदाचार्य राजेश्वर देशमुख, पुणे यांना स्वर्गीय धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय शास्त्र पुरस्कार, वेदाचार्य दुर्गादास मुळे यांना स्वर्गीय धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय यजूर्वेद सेवावर्ती पुरस्कार, वेदाचार्य स्व. श्याम सुंदर जोशी यांना स्वर्गीय धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय यजुर्वेद सेवावर्ती पुरस्कार त्यांचा पत्नीने स्वीकारला. वेदाचार्य चि. देवव्रत रेखे यांना स्वर्गीय धर्मभूषण गौरीशंकर दंडक्रम विक्रमादित्य राष्ट्रीय वेद पुरस्कार (विशेष सन्मान) शाल, मानपत्र व रुपये २१ हजार देऊन गौरविण्यात आले.




