दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
बदलते वातावरण (Climate Change) व घटत्या तापमानामुळे द्राक्ष (Grape) उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. यामुळे द्राक्षबागांवर भुरी, लालकोळी व पिंकबेरीच्या प्रादुर्भावाची शक्यता उभी ठाकल्याने द्राक्ष उत्पादक अस्वस्थ आहेत.दिंडोरी तालुक्यात द्राक्ष बागा बहरू लागल्या आहेत. थॉमसन, सोनाका, काळी पर्पल याबरोबर विविध जातीच्या द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) सध्या बदलत्या वातावरणाने उत्पादकांची काळजी वाढविली आहे.त्यामुळे तालुक्यातील व्यापारी वर्गाकडून चाचपणी सुरू आहे.
स्थानिक व्यापाऱ्यांबरोबर परप्रांतीय व्यापारीही या कार्यप्रणालीत समाविष्ट आहेत गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, कोलकाता व इतर खरेदीदारराज्यातील व्यापाऱ्यांची संख्या पाहून उत्पादकांचाही उत्साह दुणावला. मात्र या उत्साहाला नजर लागली ती अनैसर्गिक वातावरणाची. सध्यस्थितीत थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने तापमान घसरले आहे. नेमके हेच वातावरण द्राक्ष बागांसाठी मारक असल्याचे उत्पादकांचे (Manufacturer) म्हणणे आहे. भूरी, लालकोळी, पिंकबेरी याच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढली आहे. द्राक्षामध्ये साखरभरणीस अटकाव, द्राक्षमण्यांचा रंग बदलणे, उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होणे अशा प्रतिकूल परिस्थीतीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसु लागल्याने उत्पादक हतबल झाले आहेत. अशा सर्व परिस्थितीमुळे उत्पादक कोंडीत सापडले आहेत.
महिनाभरापूर्वी परिसरात रिमझिम स्वरूपाचा पाऊस (Rain) पडल्यामुळे द्राक्षांना फटका बसला. द्राक्षे चिरली गेली आहेत. साधारणतः द्राक्ष २० ते २५ दिवसांनी काढणीवर येणार असल्याने या ढगाळ वातावरणात त्याअगोदर जर पाऊस पडला तर संपूर्ण द्राक्ष बाग खराब होऊन द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. या सर्व रोखण्यासाठी द्राक्ष उत्पादकांना सकाळ संध्याकाळी महागडी औषध फवारणी करावी लागत आहे. द्राक्षबागांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो परंतू केलेला खर्च भरुन निघत नसल्याने द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
शेतकऱ्यांपुढे अनेक संकटे
मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी पूर्व पदावर आलेला नसताना पुन्हा अवकाळीचे नवीन संकट उभे राहिले आहे. सततच्या हवामान बदलामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून शेतकऱ्यांपुढे कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. जगाचा पोशिंदा एका मोठ्या धोक्याच्या वळणावर उभा असून राजकीय व्यवस्था शेतकऱ्यांना अशा संकटातून कशी सावरणार ? हा एक चर्चेचा विषय ठरणार आहे.