नाशिक | Nashik
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या (Kusumagraj Pratishthan) वतीने एक वर्षाआड देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार यावर्षी नाटककार, नाट्यदिग्दर्शक अभिनेते सतीश वसंत आळेकर (Satish Alekar) यांना घोषित करण्यात आला आहे. प्रतिष्ठानच्या वतीने या पुरस्काराची घोषणा आज (सोमवारी) येथे करण्यात आली. वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षाआड जनस्थान हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी पुरस्काराची घोषणा पुरस्कार समितीचे सदस्य कुमार केतकर, वसंत डहाके आणि ॲडव्होकेट विलास लोणारी यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.
यावेळी ते म्हणाले की, “यावर्षीचा जनस्थान पुरस्कार (Janasthan Award) हा अभिनेते आणि नाटककार सतीश वसंत आळेकर यांना घोषित करण्यात आला आहे. पुण्याच्या थेटर अकॅडमीचे संस्थापक सदस्य असलेले आळेकर यांनी आतापर्यंत सुमारे ५० पेक्षा अधिक नाट्य दिग्दर्शन आणि अभिनेता म्हणून काम केलेले आहे. त्यामध्ये महापूर अतिरेक पिढीच्या महानिर्वाण मिकी आणि मेमसाब यासारखी नाटके चांगलीच गाजली आहेत. सतीश आळेकर यांचा जन्म दिल्लीमध्ये झाला असला तरी ते पुण्यातील मराठी कुटुंबामध्ये वाढले आहेत.त्यांचे शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले असून त्यांनी विज्ञान या विषयामध्ये पदवी पूर्व शिक्षण घेतलेले आहे.
येत्या १० मार्च रोजी नाशिक (Nashik) येथील एका कार्यक्रमांमध्ये प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कॉलेजरोड येथील गुरुदक्षिणा सभागृहात सतीश आळेकर यांना या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे. यावेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सुरेश भटेवरा, लोकेश शेवडे ॲडव्होकेट दत्तप्रसाद निकम , राजेंद्र दोखळ , सीसीलिवो कारवालो व इतर सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, यापूर्वी हा पुरस्कार २०२३ मध्ये आशा बेग यांना देण्यात आला होता. त्यापूर्वी सर्वप्रथम १९९१ मध्ये विजय तेंडुलकर त्यानंतर विंदा करंदीकर, इंदिरा संत, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, बाबुराव बागुल, ना.धो. महानोर, महेश एलकुंचवार ,भालचंद्र नेमाडे, अरुण साधू ,श्रीमती विजया राज्याध्यक्ष, मधु मंगेश कर्णिक यांना देण्यात आला आहे.