Monday, August 31, 2026
Homeब्रेकिंग न्यूजTrimbakeshwar News : 'बम बम भोले'च्या जयघोषाने ब्रम्हगिरी दुमदुमली; सुमारे...

Trimbakeshwar News : ‘बम बम भोले’च्या जयघोषाने ब्रम्हगिरी दुमदुमली; सुमारे दोन लाखांहून अधिक भाविकांची शक्यता

पोलिसांचा चोख बंदोबस्त

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar

- Advertisement -

तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी (Brahmagiri Circumambulation) रविवारी (दि.३०) रोजी हजारो भाविक त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) नगरीत दाखल झाले होते. रात्री ८ वाजेपासूनच भाविकांनी कुशावर्तावर स्नान करत ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला सुरुवात केली होती. यावेळी ‘बम बम भोले’ च्या जयघोषाने संपूर्ण त्र्यंबकनगरी दुमदुमून गेली होती. सकाळी प्रदक्षिणा मार्गावर विविध ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांकडून भाविकांसाठी चहा आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला.

दरम्यान भाविकांची (Devotees) वाढती गर्दी (Crowd) लक्षात घेता प्रशासन व पोलीस यंत्रणेने ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावर जागोजागी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. तर खासगी वाहनांना शहरात प्रवेश नाकारण्यात आला होता. ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी काही भाविक मध्यरात्रीपासूनच मार्गस्थ झाले, तर काही भाविक पहाटे प्रदक्षिणेला रवाना झाले. त्र्यंबकेश्वर येथे आल्यानंतर विश्रांती, स्नान, देवदर्शन आणि त्यानंतर प्रद‌क्षिणेसाठी जाण्याचे नियोजन अनेक भाविकांनी केल्याचे दिसून आले.

प्रदक्षिणेची मोठी श्रद्धा असल्याने आज (सोमवारी) शहरात दिवसभर भाविकांची वर्दळ पाहायला मिळणार आहे. भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांकडून (Police) शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. कुंभमेळा बसस्थानक, जव्हार रोड, पोलीस ठाणे मार्गे सुंदराबाई मठ आणि त्यानंतर कुशावर्त तीर्थ असा भाविकांच्या हालचालींचा मार्ग निश्चित करण्यात आला असून, मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविक ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या मार्गावर जात आहेत.

सुमारे दोन ते तीन लाख भाविकांची शक्यता

तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये सुमारे दोन ते तीन लाख भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने सिंहस्थ कुंभमेळ्याप्रमाणेच नियोजन केले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः त्र्यंबकेश्वरमध्ये उपस्थित राहून व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. तर नगरपालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनाही ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. दुसरीकडे आज पेड दर्शनाची रांग बंद ठेवण्यात आली असून, भाविकांची गर्दी आणि सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पावसाने काहीशी उघडीप दिल्याने भाविकांना प्रदक्षिणा व दर्शनासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

वाहतूक व्यवस्थेत बदल

खंबाळे येथील वाहनतळावरून त्र्यंबकेश्वर शहरात येणाऱ्या भाविकांसाठी मोठ्या संख्येने एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक तसेच जव्हारकडून येणाऱ्या एसटी बस जव्हार रोड चौकातील बाजार समितीलगत थांबविण्यात येत आहेत. त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या भाविकांना उतरविल्यानंतर रिकाम्या बस मेळा बसस्थानकाकडे रवाना करण्यात येत आहेत. मेळा बसस्थानकातून नाशिककडे जाणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र बस व्यवस्था करण्यात आली आहे. येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांची एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. वाहनतळावरून सुंदराबाई मठ मार्गे कुशावर्त तीर्थाकडे भाविकांना जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कुशावर्त तीर्थाचे दर्शन घेतल्यानंतर मेनरोडमार्गे भाविक त्र्यंबकेश्वर मंदिराकडे रवाना होत आहेत. मंदिराच्या पूर्व दरवाजाकडे जाणाऱ्या भाविकांसाठी स्मशानभूमी रोडचा मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या