Friday, May 3, 2024
Homeनाशिकपदवीसाठी सर्व वर्षांचे गुण ग्राह्य?

पदवीसाठी सर्व वर्षांचे गुण ग्राह्य?

नाशिक ।  प्रतिनिधी

पदवी देताना शेवटच्या वर्षांचे किंवा दोन वर्षांचे गुण ग्राह्य न धरता सर्व कालावधीतील गुण ग्राह्य धरले जाण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याबाबत सूचना दिली आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या गुणपत्रिकांवर श्रेयांकाबरोबरच यापुढे गुणही नमूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

राज्यातील विद्यापीठांमध्ये केंद्राच्या धोरणानुसार श्रेयांक पद्धतीने मूल्यांकन केले जात असले तरीही प्रत्येक विद्यापीठाची पद्धत वेगळी आहे. काही विद्यापीठे तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात शेवटच्याच वर्षांचे गुण ग्राह्य धरतात, काही विद्यापीठे दोन वर्षांचे किंवा चार सत्रांचे गुण ग्राह्य धरतात. सत्र रचनेतही प्रत्येक विद्यापीठात तफावत आहे.

मात्र, यापुढे पदवीचे गुण म्हणून ग्राह्य धरताना तिन्ही वर्षांचे किंवा सर्व सत्रांचे गुण ग्राह्य धरण्यात येण्याची शक्यता आहे. सामंत यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे गुणपत्रिकेवर श्रेयांकाबरोबरच गुणही नमूद करण्यात येणार आहेत. देशभरातील विद्यापीठांमध्ये श्रेयांक मूल्यांकन लागू केल्यानंतरही अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या श्रेणीऐवजी गुण ग्राह्य धरण्यात येतात.

देशपातळीवरील शिक्षण, मूल्यांकन यांमध्ये एकसूत्रता यावी आणि शिक्षणात लवचीकता असावी यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने श्रेयांक पद्धत लागू केली. असे असले तरी अगदी देशातील प्रशासकीय परीक्षांसाठीही विद्यार्थ्यांना गुण विचारण्यात येतात. परदेशी विद्यापीठे अनेक खासगी कंपन्याही श्रेणीऐवजी गुणांची मागणी करतात. त्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडे स्वतंत्र अर्ज करून गुण किंवा टक्केवारी मिळवावी लागते.

अनेकदा ही प्रक्रिया वेळखाऊ होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर मूल्यांकन पद्धत बदलण्याची किंवा गुणही देण्याची मागणी विद्यार्थी करत होते. त्या अनुषंगाने आता गुणपत्रिकेवर श्रेणीबरोबरच गुणही नमूद करण्यात येणार आहेत.

विद्यापीठांना सूचना
‘अकृषी विद्यापीठांच्या गुण देण्याच्या पद्धतीमध्ये एकसारखेपणा असावा यासाठी येत्या शैक्षणिक वर्षांपासून श्रेयांक पद्धतीसह गुणपत्रिकेवर टक्केवारी नमूद करण्यात यावी. तसेच पदवीचा संपूर्ण कालावधी धरून सर्व सत्रांचे गुण विचारात घेऊन पदवी देण्यात यावी, अशा सूचना विद्यापीठांना देण्यात येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या