Friday, May 3, 2024
Homeनाशिक४९ हजार नव्या वाहनांची नोंदणी; विभागात दीड लाख नवी वाहने रस्त्यावर

४९ हजार नव्या वाहनांची नोंदणी; विभागात दीड लाख नवी वाहने रस्त्यावर

नाशिक । भारत पगारे

आर्थिक मंदीचा फटका ऑटोमोबाईल क्षेत्राला बसत असला तरी, दुसरीकडे जिल्ह्यात गेल्या सात महिन्यांत ४९ हजार नवीन वाहने रस्त्यावर धावत आहे. नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाकडे या वाहनांची नोंदणी झाली आहे. तसेच नाशिक विभागात १ लाख ६७ हजार नव्या वाहनांची नोंद झाल्याचे नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत ४९ हजार १७२ नव्या वाहनांची नोंद झाली आहे. यात ३४ हजार सहाशे १७ मोटार सायकलींची नोंदणी करण्यात आली असून २५२ मोपेड व ३९ स्कूटरचा समावेश आहे. त्या खालोखाल ७१९४ मोटार कारची नोंद झाली असून १८८० नवीन रिक्षांचीही नोंद झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात २५३५ नवीन ट्रक, लॉरी, ९१ टँकर, ८ रुग्णवाहिका, १६६६ ट्रॅक्टर, २२० ट्रेलर, अन्य ९९, १९६ स्कूल बस, ७६ लक्झरी व टुरिस्ट कार्स, १५२ तिचाकी डिलिव्हरी व्हॅन अशा एकूण वाहनांची नोंद झाली आहे.

दरम्यान, नाशिक आरटीओच्या विभागातील अहमदनगर जिल्ह्यात २१ हजार ६३७ नव्या वाहनांची नोंद झाली आहे. यात १६ हजार ३१२ मोटार सायकलींचा समावेश आहे. १५६३ कारचा समावेश असून १४२० ट्रँक्टरची नोंद झाली असून २७५ ट्रकचीही नोंदणी झाली आहे. श्रीरामपूरमध्ये २१ हजार ७९ वाहनांंची नोंद करण्यात आली असून मालेगाव येथे १४ हजार ८६१ वाहनांची नोंद झाली आहे. नाशिक प्रादेशिक परिवहन विभागातील नाशिक, मालेगाव, अहमदनगर व श्रीरामपूर येथे एकूण १ लाख ६७ हजार ४१ वाहनांचे नोंद झाली आहे.

७९ हजार नव्या दुचाकी रस्त्यावर
गेल्या सात महिन्यात नाशिक विभागात ७८ हजार ८७७ नव्या दुचाकी रस्त्यावर धावत आहेत. तर ५ हजार ५५५ नवीन ट्रॅक्टर शेतीसाठी घेण्यात आले आहेत.

एकही सरकारी वाहनाची नोंद नाही
गेल्या सात महिन्यांत खासगी क्षेत्रातूनच वाहने नोंदविण्यात आली आहे. मात्र विभागातून शासनाच्या एकाही विभागाने कोणतेही वाहन नोंद केलेले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या