Sunday, May 5, 2024
Homeनाशिक‘राम तेरी गंगा मैली हो गयी……’गोदापात्रातील कचरा व्यवस्थापन कधी होणार?

‘राम तेरी गंगा मैली हो गयी……’गोदापात्रातील कचरा व्यवस्थापन कधी होणार?

नाशिक । प्रतिनिधी

प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या, देशातील प्राचीन तीर्थक्षेत्र असणार्‍या गुलशनाबाद अर्थात नाशिक मधून वाहणारी पवित्र गोदामाई आज शापिताचे जीवन जगत आहे. लाखोंच्या संख्येने येणार्‍या भाविकांचे पापक्षालन करणार्‍या गोदावरीचे आजचे रुपडे पहिले तर ’राम ’तेरी गंगा मैली हो गयी ..’ या पेक्षा वेगळी उपमा देणे परिस्थितीला विसंगत होईल.

- Advertisement -

कुंभनगरी असणार्‍या नाशिकमधील गोदामाईच्या पात्रातील कचर्‍याचे व्यवस्थापन योग्य रीतीने होऊन तिचे बकालपण हटवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभलेल्या रामकुंडाच्या परिसरात नाशिकचे भूषण म्हणावे असे काहीच दिसत नाही.डोळ्यात भरणार्‍या गोदापात्रात जिकडे बघावे तिकडे कचर्‍याचे साम्राज्य असून गोदातटाने फेरफटका मारायचा म्हटले की, आपसूकच नाक दाबायला होते.

दूषित पाणी,पाळीव प्राण्यांचा मुक्त संचार, नदीपात्रातील घाण पाण्यातच धुतले जाणारे कपडे, निर्माल्याचा जागोजागी पडलेला आणि पाण्यात तरंगणारा खच पाहिला की उकिरडा वाटावा अशी अवस्था गोदामाईची बनली आहे. गेल्या पावसाळ्यातील महापुराने नदीपात्र धुवून टाकले असले तरी प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे पुन्हा तीच अवस्था रामकुंडापासून ते दसकच्या घाटापर्यंत झाली आहे.

दक्षिणेची काशी असे महत्त्व हिंदू धर्मात नाशिकचे असून गोदावरीला गंगा नदीच्या खालोखाल पवित्र मानले जाते. मात्र गोदेचे हे पावित्र्यच धोक्यात आले आहे.महानगर म्हणून वेगाने विस्तारणार्‍या या शहराच्या कारभार्‍यांचे देखील याकडे दुर्लक्ष झाले आहे.

गोदापात्र स्वच्छ राखण्याचे आवाहन करणारे फलक देखील निर्माल्य आणि कचर्‍याच्या ढिगार्‍याखाली गेले असून या परिस्थितीला जबाबदार कोण असे म्हणण्यापेक्षा गोदामाईची होणारी विटंबना थांबवण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून नियमांची कठोरतेने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या