Friday, May 3, 2024
Homeनाशिकजि. प. प्रशासकीय इमारतीचे उद्या भूमिपूजन

जि. प. प्रशासकीय इमारतीचे उद्या भूमिपूजन

नाशिक । प्रतिनिधी

बहुप्रतिक्षीत जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भुमीपूजन ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते गुरुवारी (दि.२६) सकाळी ११ वाजता होणार आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत व माजी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कल जवळ नवीन प्रशासकीय इमारत उभारली जाणार आहे. युती सरकारने यासाठी ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. काही महिन्यांपासून तांत्रिक मान्यतेअभावी भुमीपूजन सोहळा रखडला असताना राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या इमारतीचा भुमीपूजन सोहळा घेण्याचे नियोजन जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांनी सुरू केले होते.

दि. २८ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री प्रथमच नाशिकमध्ये येणार असल्याची चर्चाही सुरु झाली होती. प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी करत शासकीय विश्रामगृहातील बहुतांशी खोल्यास मंत्र्यांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे नेते तथा ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते हा सोहळा पार पडेल.

राजकीय घडामोडींना वेग
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड २ जानेवारीला होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते भुजबळ नाशिकमध्ये येत आहेत. त्यांच्या या दौर्‍यात शिवसेना, काँग्रेसचे नेतेही उपस्थित राहणार असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी जागा वाटपाचा तिढा संयुक्तपणे चर्चा करुन सोडवला जाईल, अशी शक्यता आहे. शिवसेनेचा अध्यक्ष झाला तरी, भुजबळ यांचाच त्यासाठी शब्द अंतिम राहणार असल्याची चर्चा आहे.

नवीन प्रशासकीय इमारतीचे भुमीपूजन राष्ट्रवादीचे नेते तथा ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिवसेना नेते खा. संजय राऊत व माजी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे उपस्थितीत राहणार आहेत. यासंंदर्भात पदाधिकारी व सदस्यांसमवेत आढावा बैठक घेऊन अधिकार्‍यांना तयारीचे आदेश दिले आहेत.
शितल सांगळे (अध्यक्षा जिल्हा परिषद)

- Advertisment -

ताज्या बातम्या