Friday, May 3, 2024
Homeनाशिकदूध दरवाढीत शेतकर्‍यांचे हात कोरडेच

दूध दरवाढीत शेतकर्‍यांचे हात कोरडेच

नाशिक । प्रतिनिधी

राज्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रविवारपासून दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली. गाय आणि म्हशीच्या दूध दरात ही वाढ असून त्यासोबतच दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. या दरवाढीचा ग्राहकांना फटका बसला असून दूध उत्पादक शेतकर्‍यांनादेखील नुकसान सोसावे लागत आहे. शेतकर्‍याला मिळत असलेल्या दुधाच्या किमतीत खर्च देखील भरून निघत नसल्यामुळे आमचे हात कोरडेच राहिले असल्याची खंत शेतकर्‍यांची आहे.

- Advertisement -

राज्यातील खासगी आणि सहकारी दूध संघांच्या बैठकीत पिशवीबंद दुधाच्या किमतीत दोन रुपये प्रतिलिटर वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी अन्य दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीतदेखील वाढ करण्यात आली आहे. दुधाच्या दरात वाढ झाल्यानंतर शेतकर्‍यांकडून खरेदी करण्यात येणार्‍या दुधाचे दरदेखील वाढतील, अशी अपेक्षा होती. मात्र असा कोणताच निर्णय अद्याप झाला नसून शेतकर्‍यांकडून ३१ रुपये दराने दूध खरेदी करण्यात येत आहे. हेच दूध प्रक्रिया करून ग्राहकांना ४८ रुपयांपर्यंत विकण्यात येत आहे. म्हणजेच दूध दरवाढीचा व्यावसायिकांना फायदा होत असून शेतकर्‍यांचे हात मात्र कोरडेच राहिले आहेत.

शेतकर्‍यांना मिळणार्‍या दराचा विचार करता उत्पादन खर्चदेखील भागवता येत नसून केवळ नाईलाज म्हणून पशुधन सांभाळावे लागत आहे. व्यावसायिकांकडून दुधाचे दर वाढवण्यात आल्यावर अन्य दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीतदेखील वाढ झाली आहे. बटर आणि दूध पावडरच्या किमती ३०० रुपयांच्यावर पोहोचल्या असून बटर ३२० रुपये आणि दूध पावडर ३३० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. दूध पावडरचा हाच दर गेल्यावर्षी २२० रुपये होता. राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजारात २० ते २५ टक्के दूध उत्पादन घटले आहे.

राज्यात दैनंदिन २ कोटी ४० लाख प्रतिदिन दुधाचे उत्पादन होते. त्यापैकी ६५ लाख लिटर पॅकिंग दुधाची विक्री करण्यात येते. याशिवाय बटर आणि पावडर निर्मितीसाठीदेखील मोठ्या प्रमाणात दुधाची गरज असते. मात्र उत्पादनात घट झाल्याने राज्यात दुधाचा तुटवडा जाणवत आहे. याचा परिणाम म्हणून दोन रुपये वाढीव दराने ग्राहकांना दुधाची विक्री करण्यात येत आहे. त्या तुलनेत शेतकर्‍यांना मिळणारा मोबदला अत्यंत कमी असून व्यावसायिक मात्र भरमसाठ नफा कमवत आहेत. व्यावसायिकांनी दुधाच्या विक्री दरात आणि अन्य दूध उत्पादनांच्या किमतीत वाढ केली असली तरी उत्पादक म्हणून मिळणारा मोबदला वाढला नसल्याची खंत शेतकर्‍यांची आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या