भाऊसाहेब नगर | वार्ताहर | Bhausaheb Nagar
निफाड साखर कारखाना (Niphad Sugar Factory) बंद असल्याने परिसरात व कारखान्यातील आवारात बिबट्यांनी हैदोस घातला आहे. जवळपास चार ते पाच बिबटे (Leopard) कारखाना आवारात गेल्या आठ ते दहा दिवसापासून वावरत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ‘निसाका’ कार्यस्थळावरील नागरिक विद्यार्थी ,जीव मुठीत धरून या परिसरात वावरत आहे. याबाबत वनविभागाने कुठलीही उपाययोजना न केल्याने जीवितहानी झाल्यानंतर वनविभागाला जाग येणार का? असा संतप्त सवाल ‘निसाका’ परिसरातील नागरिकांनी ‘दैनिक देशदूत’कडे व्यक्त केली.
निफाड कारखान्याच्या संरक्षक भिंतीवरून रात्री आठ वाजेच्या सुमारास बिबटे दररोज फिरत असतात. नर, मादी व दोन पिल्ले असे एकूणचार बिबटे असल्याचे येथील नागरिकांनी (Citizen) सांगितले. ‘निसाका’ अर्थात भाऊसाहेब नगर कार्यस्थळावर चार मोठी शैक्षणिक विद्यालय असून संरक्षण भिंतीच्याच्या शेजारून रामाचे पिंपळस, कसबे व मौजे सुकेणे येथील विद्यार्थी शैक्षणिक अध्ययनासाठी सायकलवर सकाळी सहा वाजेपासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत प्रवास करतात.
दरम्यान, शिक्षणासाठी (Education) बाहेर गावाहून येणार्या विद्यार्थ्यापैकी एखाद्या विद्यार्थ्याला वा विद्यार्थिनीला बिबट्यांनी उचलले तर याला जबाबदार कोण? असाही प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. यापूर्वी गोदाकाठ परिसरात बिबट्याने विद्यार्थ्यांना पळवल्याचे प्रकार घडले आहेत. तेव्हा वेळीच तालुक्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासनाने वनविभागाला या प्रश्नात लक्ष घालून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.





