नाशिक | Nashik
शहरात चौथ्या विश्व मराठी संमेलनाची (Marathi Vishwa Sammelan) सुरुवात मोठ्या उत्साहात झाली. महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संमेलनाला शुभेच्छा दिल्या. यानंतर संमेलनाचा प्रारंभ मराठी बोलींच्या महोत्सवाच्या उद्घाटनाने झाला.या बोलीभाषा महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ. सदानंद मोरे, डॉ. मिलिंद जोशी, ॲड. नितीन ठाकरे, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.नाशिक महानगरपालिकेचे उपमहापौर विलास शिंदे यांनी सर्व साहित्यिक व मराठी भाषा-प्रेमींचे स्वागत केले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे तसेच मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
हे देखील वाचा : Marathi Vishwa Sammelan : विश्व मराठी संमेलनासाठी नाशिकनगरी सज्ज
यावेळी आपल्या मनोगतात मधु मंगेश कर्णिक यांनी नाशिकचे भूमिपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कविवर्य कुसुमाग्रज यांचे स्मरण केले.ते म्हणले की, “माझ्या उतारवयात मला विश्व मराठी संमेलन पाहायला मिळाले, हे माझे भाग्य आहे,” असे म्हणत त्यांनी आयोजकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तर बोलीभाषांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील बोलींनी मराठी भाषा समृद्ध केली आहे. कोकणातच बारा बोली बोलल्या जातात, ज्ञानेश्वरीतही मालवणी शब्द आढळतात. “बोली म्हणजे पंचपक्वनाचे ताट; बोली समृद्ध झाल्याशिवाय मराठी समृद्ध होणार नाही,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
डॉ.सदानंद मोरे यांनी नाशिकमध्ये संमेलन भरत असल्याचे समाधान व्यक्त करत म्हटले की,बारा वर्षांपूर्वी झालेल्या पहिल्या संत साहित्य संमेलनाची आठवण झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रातील संतपरंपरेचे वैशिष्ट्य, नाशिकचे ऐतिहासिक महत्त्व आणि भाषिक वैविध्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ज्ञानेश्वरीसह विविध ग्रंथांत बोलीभाषांचा वापर दिसतो, त्यामुळे भाषेवरून कोणालाही दुजाभाव करू नये, असे मत त्यांनी मांडले.
दरम्यान, मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी नाशिकमध्ये (Nashik) भरलेल्या या सांस्कृतिक व भाषिक मेजवानीबद्दल आनंद व्यक्त करत महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. तर डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या हस्ते काही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात त्यांनी भाषा व संस्कृतीविषयी जागृतीसाठी शासन करत असलेल्या प्रयत्नांचे अभिनंदन केले तसेच उदय सामंत यांचेही कौतुक केले. पुढील काही वर्षांत इंग्रजीच्या भाषिक साम्राज्यवादामुळे जगातील अनेक भाषा नष्ट होण्याचा धोका असून, मराठीवर बोलीभाषांतून काम होणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.
अहिराणी भाषेतील गाण्यांचे सादरीकरण
अहिराणी भाषेतील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला असताना जगभरातील श्रोत्यांनी ही गाणी डोक्यावर घेतली. अहिराणी गाण्यांचा कार्यक्रम संमेलनात ही तेवढ्याच दणक्यात पार पडला. अहिराणी संस्कृती गाण्याद्वारे सादर होत असताना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. श्रोत्यांच्या टाळ्या,शिट्या,आरोळ्यांनी कलामंदिर दुमदुमून गेलं. विनोद कुमावत यांच्या प्रचंड गाजलेल्या झुमका वाली पोर या गाण्यावर स्वतः विनोद कुमावत यांनी श्रोत्यांच्या प्रचंड प्रतिसादात नृत्य ही सादर केलं. इतर कलाकारांचं सादरीकरण ही तेवढ्याच दमाचं होतं. कानबाई हा खान्देशातला श्रावण महिन्यातला विशेष सण,त्या सणाबद्दल ची गाणी ही यात सादर झाली. तरुणांनी नाट्यगृह अक्षरशः डोक्यावर घेतलं.
बोहडा, तारपाला प्रेक्षकांची दाद
बोहडा अर्थात मुखवटा या पारंपरिक लोकनृत्याचं सादरीकरण कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात पार पडलं. आदिवासी समाजाद्वारे बोहडा हे लोकनृत्य गावागावात सादर केलं जातं. हिंदू धर्मातील विविध देवतांचे मुखवटे लावून वारली,कोकणा आणि ठाकूर जमातींकडून हे समूह नृत्य सादर केलं जातं. लोकसंगीताच्या तालावर ठेका धरत मोठ्या ऊर्जेने कलाकार आपलं नृत्य सादर करतात. संगीताच्या ठेक्यावर प्रेक्षकांचे पाय ही आपसूकच थिरकत होते. तारपा हा नृत्य प्रकार ही यावेळी सादर झाला. रिंगण करून हे समूह नृत्य सादर केलं गेलं. लोकसंस्कृतीला व्यासपीठ मिळणं हे संस्कृती टिकवण्यासाठीचं एक महत्वाचं पाऊल आहे.




