सातपूर | नाशिक | Satpur
सातपूर औद्योगिक वसाहतीतील (Satpur Industrial Estate) कार्बन नाका परिसरातील (Karban Naka Area) नावाजलेल्या अभिषेक बेकरीला आज (शनिवार) पहाटे सुमारे पाच वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण बेकरी जळून खाक झाली असून, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सातपूर औद्योगिक क्षेत्रातील कार्बन नाका परिसरात असलेल्या अभिषेक बेकरीला मध्यरात्री आग (Fire) लागल्यानंतर काही क्षणांतच आगीने भीषण स्वरुप धारण केले होते. त्यामुळे परिसरातील उद्योगांमध्ये घबराट पसरली. यावेळी घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे चार बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. ही आग इतकी भीषण होती की दूरवरूनही धुराचे लोट स्पष्टपणे दिसत होते.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीसही (Satpur Police) घटनास्थळी दाखल झाले होते. तर आग लागण्याचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, यासंदर्भात तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकार्यांनी सांगितले. यावेळी घटनास्थळी माजी नगरसेविका इंदूबाई नागरे, युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील यांनी भेट देऊन अभिषेक बेकरी चालकांना धिर देत घटनेची अधिक माहिती घेतली.





