नाशिक | Nashik
अध्यात्मिक शक्तीचा डामडौल आणि मंत्र-तंत्राचा बनाव करून महिलांवर अत्याचार करणाऱ्या ‘स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातला (Ashok Kharat) नाशिक पोलीसांनी (Nashik Police) अटक केली आहे. यानंतर मंगळवार (दि.२४ मार्च) पर्यंत नायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. खरातसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे फोटो समोर आले होते. त्यामुळे विरोधकांकडून चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती.
त्यानंतर काल (शुक्रवार) रात्री त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडे सुपूर्द केला. दरम्यान यानंतर पवार यांनी तो राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविला आहे. या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, “अंधश्रद्धेपासून दूर राहिले पाहिजे असं माझे मत आहे. काही चांगले साधू देखील असून,ते चांगले काम करत आहेत. अशोक खरातकडे फार मोठी मंडळी येत होती. रुपाली चाकणकर पुण्याच्या असून त्यांना काय माहिती? त्यांना सुद्धा तिकडे कोणीतरी नेले असेल. पण राजकीय क्षेत्रात काम करणार्यांनी काही बंधने पाळले पाहिजे. काही सीमा आखून ठेवल्या पाहिजे. कारण आपण जे करतो त्याचा परिणाम जनतेवर होतो. कारण आम्ही पुढारी आहोत. मंत्री जातात मग आपण जायला काय हरकत आहे? पोलीस याबाबत चौकशी करत असून, कारवाई होईल” असे भुजबळ यांनी म्हटले.
पुढे रुपाली चाकणकरांच्या (Rupali Chakankar) राजीनाम्याबाबत बोलतांना भुजबळ म्हणाले की, “राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद हे संविधानिक पद आहे. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निर्णय घेतला. मात्र त्यांच्याकडे असलेल्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार निर्णय घेतील”, असे त्यांनी सांगितले. तसेच ज्यांच्यावर अन्याय झाला असेल ते पुढे येतील. जे अधिकारी नेमले आहेत ते चौकशी करून कारवाई करतील, असे देखील ते म्हणाले.
हे देखील वाचा : Ashok Kharat News : नाशिक जिल्ह्यातील ‘या’ बड्या नेत्यांचे निवडणुकांमधील भविष्य खरातने सांगितले; पण सगळे ठोकताळे खोटे निघाले
भुजबळांनाही खरातकडे जाण्यासाठी सांगण्यात आले होते
पत्रकार परिषदेत बोलतांना भुजबळ म्हणाले की, “कॅप्टन अशोक खरातकडे जाण्यासाठी आमचे लोक देखील सांगत होते. पंरतु, मी काही गेलो नाही. त्यामुळे त्याच्याबाबत मला काही अधिक माहिती नाही”, असे त्यांनी म्हटले.





