सिन्नर | विलास पाटील | Sinnar
खरातने वर्तवलेले भविष्य कधीच खोटे ठरत नाही, असे म्हटले जायचे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्याने वर्तवलेले राजकीय निवडणुकांमधील (Election) ‘विजया’चे गणित खोटे ठरू लागले होते. तरीही राजकीय क्षेत्रातील मातब्बरांची त्याच्याकडची उठबस कमी झाली नव्हती. सन १९९९ मध्ये माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आपल्या पहिल्यांदा विधानसभेच्या निवडणुकीला उभे होते. त्यावेळी तत्कालीन राज्यमंत्री स्व. तुकाराम दिघोळे यांना सत्तेत १५ वर्षे झाली होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये नाराजी वाढणे साहजिक होते. त्यावेळी सर्वसामान्य सिन्नरकरांनी कोकाटेंना भरभरून वर्गणी देत निवडणुकीला उभे केले होते. या निवडणुकीत कोकाटेंचा विजय होईल, हे सांगायला कुणाही भविष्यवेत्याची गरज नव्हती. मात्र, त्यावेळी कोकाटेच विजयी होतील, असे भाकित खरातने केल्याची चर्चा होती.
कोकाटेंना विजयाचा आनंद साजरा करता आला नाही, हे भाकितही खरे ठरले होते. मात्र, कोकाटेंच्या चौथ्या टर्मनंतर त्यांच्याहीबद्दल नाराजी वाढणेही साहजिक होते. त्यावेळी विरोधात उभे राहिलेल्या राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनाही सिन्नरकरांनी भरभरून देणग्या दिल्यानंतर तेच विजयी होणार हे कुणीही सांगू शकत होते. राजाभाऊ खरातपासून नेहमीच चार हात दूर राहिले आहेत. मात्र, खरातच राजाभाऊंच्या समर्थकांना राजाभाऊच निवडून येणार हे छाती ठोकून सांगत होता. ते खरे ठरले. मात्र, त्याचवेळी कोकाटेंच्या नशिबी आता कायमच अपयश येणार असे सांगणार्या खरातचं भविष्य पुढच्याच निवडणुकीत खोटं ठरवत कोकाटे पाचव्यांदा निवडून आले. राजाभाऊ खासदारकीच्या निवडणुकीला उभे राहिल्यानंतर ते कशाला उभे राहिले? ते चौथ्या पाचव्या नंबरवर जातील, असे भविष्य खरातने राजाभाऊंच्याच अनेक समर्थकांसमोर व्यक्त केल्याची चर्चा होत होती. मात्र, राजाभाऊ विक्रमी मतांनी खासदार बनले. तत्कालीन खासदार हेमंत गोडसेच विजयाची हॅट्ट्रिक करणार असे छातीठोकपणे सांगणार्या खरातचे तेही भविष्य खोटे ठरल्याची चर्चा त्यावेळीहोत होती.
धुळे-मालेगाव लोकसभा मतदारसंघासाठी तर भाजपच्या लाटेमुळे काँग्रेसला (Congress) उमेदवारच मिळत नव्हता. ऐनवेळी काँग्रेसने माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली. डॉ. बच्छाव यांचे वास्तव्य नाशकातच असल्याने त्या आपल्या पतीसह खरातला भेटायला गेल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. या भेटीत निवडणुकीला उभे राहण्याचा वेडेपणा करू नका. तुम्ही पार शेवटच्या नंबरला राहाल, असा इशारा वजा सल्ला ‘भाजप’चा फॅन असलेल्या या खरातने व्यक्त केल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. या निवडणुकीतला निकाल आणि मालेगाव शहराने बिघडवलेले विजयाचे गणित साऱ्यांना तोंडात बोट घालायला लावणारे असले तरी खरातची ‘भविष्य’वाणी खोटी ठरू लागली असल्याचेही अधोरेखित करत होते.
विधानसभा निवडणुकीच्या आधी मंत्री असणारे बच्चू कडूही (Bacchu Kadu) खास ‘वेळ’ घेऊन खरातला भेटायला मिरगावच्या कार्यालयात आले होते. कडूंनी आपला ‘प्रहार’ पक्ष भाजपत विलीन करून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी यासाठी त्यांच्यावर दबाव येत असल्याची चर्चा त्यावेळी होत होती. त्याबाबत योग्य निर्णय घेता येत नसल्याने कडू खरातचा सल्ला घ्यायला आल्याची चर्चा तेव्हा ऐकायला मिळत होती. तुमच्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व तसेच राहू द्या, राज्यात पुन्हा भाजपचीच सत्ता येणार असून त्यात तुम्ही पुन्हा मंत्री असाल, असे भविष्य खरातने वर्तवल्यावर एवढ्या दूर आल्याचे सार्थकी लागल्याचे समाधान घेऊन कडू तेथून परतले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या चिन्हावर निवडून येण्याचे खरातचे भाकित खोटे ठरले आणि पुन्हा ‘दिव्या’च्या गाडीत फिरण्याचे कडूंचे स्वप्नही भंगल्याचे साऱ्या महाराष्ट्राने पाहिले. तरीही खरातची ख्याती कमी व्हायचे नाव घेत नव्हती. राजकारण्यांचा ओघ वाढतच होता.
ललित महाराजाच्या आठवणी झाल्या जाग्या
बरोबर २३-२४ वर्षांपूर्वी सिन्नरमध्ये (Sinnar) ललित महाराज नावाचा एक तारणाबांड, महाराज अचानक अवतरला होता. तळ्यातल्या भैरवनाथ मंदिर परिसरात डेरा टाकलेल्या या महाराजाने शहरातल्या भल्या-भल्यांना वश केले होते. अनेक हॉटेल व्यावसायिक, डॉक्टर्स, व्यापारी त्याच्या मागे फिरू लागले होते. साहजिकच त्यांच्या घरातील महिलाही आल्या. महाराजाच्या अदाकारीवर फिदा झालेल्या एका प्रतिष्ठित हॉटेल व्यावसायिकाने त्यावेळी महाराजाला थेट नवी जीपच खरेदी करून भेट दिली होती. हळूहळू या बाबाने सरदवाडी रोडवर एक बंगला भाड्याने घेऊन तेथे आपले बस्तान बसवले होते. अनेक भाविक तेथेही आपले प्रश्न मांडण्यासाठी रांगा लावू लागले होते. अनेक मुलींचे विवाह होत नव्हते, तर काही विवाहितांना मुले होत नव्हती. त्यातूनच ‘पुत्र कामेष्टी’ यज्ञासारख्या अनेक यज्ञांची कल्पना बाबाने पुढे आणली. या यज्ञासाठी रात्री १२ नंतर अनेक आई-वडील आपल्या मुलीला घेऊन जायचे. स्वतः बाहेर थांबून मुलीला महाराजाच्या यज्ञकुंडात सोडून द्यायचे. मात्र, काही दिवसातच महाराजाचे बिंग फुटले आणि त्याला भेट दिलेली जीपही देणगी देणाऱ्यानेच हिसकावून घेतल्यानंतर महाराज गायब झाला होता. आठ-दहा वर्षांपूर्वी माळेगाव फाट्यावरील पेट्रोलपंपावर डिझेल टाकल्यानंतर पैसे न देताच मध्यरात्री वाहनासह पळालेल्या एका बाबासह त्याच्या भक्तांना पोलिसांनी संगमनेर रस्त्यावर पाठलाग करून पकडले होते. पोलीस ठाण्यात पकडून आणल्यानंतर हा बाबा ललित महाराजच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अनेक सिन्नरकरांनी दिवसभर पोलीस ठाण्यात जाऊन त्याला शिव्यांची लाखोली वाहिली होती. त्यावेळी त्याचे ढसाढसा रडणे पोलिसांनाही पाझर फोडू शकले नव्हते.





