नाशिक | Nashik
मालेगाव (Malegaon) हे हातमाग उद्योगाचे प्रमुख वस्त्रोद्योग केंद्र आहे. तसेच तालुक्यात (Taluka) शेतमालांच्या अनेक प्रमुख बाजारपेठा आहेत. तालुक्याचा झपाट्याने विकास होत असून येथे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात रहदारी वाढत आहे. त्यामुळे तालुक्यातील मुंगसे व झोडगे येथे सर्व्हिसरोड आणि उड्डाणपुल तसेच कुसुंबारोड ते राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ पर्यंत बायपास मंजुर करण्याची मागणी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केंद्रीय रस्ते, परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची नागपूर येथे भेट घेऊन केली.
महामार्ग क्र.३ मुंबई-आग्रा रोड व महामार्ग क्र.६० कुसुंबा रोडवर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यामुळे मुंगसे व झोडगे येथे मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. त्यामुळे मुंगसे व झोडगे गावालगत सर्व्हिसरोड करुन उड्डाणपुल करण्यात यावा. तसेच टेहरे येथे राजधानी हॉटेलसमोर उड्डाणपुलाचे काम सुरु असून या उड्डाणपुलाची धुळे बाजुने लांबी वाढवुन रिक्षा स्टॉपजवळ महामार्ग ओलांडण्यासाठी बोगदा तयार करण्यात यावा. पिंपळगाव-नाशिक-गोंदे विभागात महामार्गावर करण्यात येत असलेल्या व्हाईट-टॉपिंग सारखेच काम पिंपळगाव-धुळे या विभागात करुन महामार्ग सहापदरी करण्यात यावा, अशी मागणी भुसे यांनी पत्रात केली आहे.
तसेच मालेगाव तालुक्यातून (Malegaon Taluka) जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० कुसुंबारोड या महामार्गावरुन येणारी अवजड वाहने शहरातून जातांना वाहतुक कोंडीची समस्या उद्भवते. त्यामुळे कुसुंबारोडवरील वाहतुक मालेगाव शहरातून न जाता फुलेनगर (लेंडाणे)वजीरखेडे-भापगाव-निळगव्हाण- दाभाडी – टेहरे मार्गे पाटणे शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ ला वळविण्यात येण्यासाठी बायपास रोड तयार करण्यात यावा. त्याचबरोबर फुलेनगर (लेंडाणे) येथुन दसाणे-लोणवाडी- चाळीसगाव फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.३ ला जोडण्याबाबत बायपास रस्ताचे काम प्रगती पथावर आहे. कुसुंबारोड ते पाटणे रस्ता मंजुर झाल्यास पाटणे शिवार ते चाळीसगाव फाटा असा बायपास रिंग रोड तयार होईल. ज्यामुळे तालुक्यातील व परिसरातील शेतकरी, यंत्रमागधारक व इतर नागरिकांना वाहतुकीसाठी याचा फायदा होईल, असेही भुसे यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, या रस्त्यांच्या (Road) मागणीबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर या रस्त्याच्या कामांना मंजुरी दिली जाईल असे मंत्री दादा भुसे यांना आश्वासित केले आहे. त्यामुळे आता लवकरच मालेगावकरांची वाहतुक कोंडी आणि रस्त्यांचा मोठा प्रश्न सोडवला जाणार आहे.