मुंबई | Mumbai
नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) तळेगाव येथे सुरू असलेल्या एका बड्या कंपनीतील अवैध सुगंधी तंबाखू आणि गुटखा निर्मितीचा पर्दाफाश करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत सरकारला चांगलेच धारेवर धरले. तब्बल ९ कोटी रूपयांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त होऊनही या प्रकरणातील मूळ सूत्रधार आणि त्यांना अभय देणाऱ्या अधिकार्यांवर अद्याप कठोर कारवाई का झाली नाही, असा रोखठोक सवाल खडसे यांनी उपस्थित केला.
विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे या गंभीर विषयाला वाचा फोडताना आमदार एकनाथ खडसे (MLA Eknath Khadse) यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, ८ जानेवारी २०२६ रोजी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तळेगाव (दिंडोरी) येथील ‘मे. इलाईटक्रॉन इंटरनॅशनल लिमिटेड’ या कंपनीवर छापा टाकला होता. या कारवाईत ९ कोटी ६ लाख २५ हजार ४२५ रुपयांचा प्रचंड मोठा प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध उत्पादन हे स्थानिक पोलीस आणि प्रशासनाच्या आशीर्वादाशिवाय सुरू राहूच शकत नाही, असा संशय व्यक्त करत खडसे यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसाआयटी (विशेष तपास पथक) मार्फत चौकशी करण्याची आग्रही मागणी लावून धरली.
खडसे यांनी आपल्या प्रश्नातून मानवी आरोग्याशी खेळणाऱ्या या माफियांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. “राज्यात बंदी असलेला सुगंधी तंबाखू, पानमसाला, गुटखा आणि सिगारेट्सचे उत्पादन बिनधास्तपणे सुरू असताना अन्न व औषध प्रशासन विभागातील संबंधित अधिकारी काय करत होते?” असा बोचरा प्रश्न त्यांनी विचारला. या प्रकरणी केवळ गुन्हा दाखल करून चालणार नाही, तर ज्या अधिकाऱ्यांनी या अवैध कृत्याकडे दुर्लक्ष केले, त्यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
या प्रश्नाला उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Minister Narhari Zirwal) यांनी या घटनेची सत्यता मान्य केली.ते म्हणाले “याप्रकरणी मे. इलाईटक्रॉन इंटरनॅशनल लिमिटेडचे संचालक बिपिन शर्मा, अंजली बम्बोरिया, ॲडव्हर्ट मिचेल बॉरगोईन, सुसंता कुमार पांडा, व्यंकट रमेश पेनुमाका, दयानंद रे आणि आस्थापना यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या विविध कलमान्वये आणि अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत गुन्हा (F.I.R. No. ०९/२०२६) दाखल केल्याचे सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे (LCB) सोपवण्यात आला असल्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले.
दरम्यान,एकनाथ खडसे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे नाशिक जिल्ह्यासह (Nashik District) संपूर्ण राज्यातील गुटखा माफियांमध्ये खळबळ माजली आहे. खडसे यांनी या विषयाचा ज्या पद्धतीने पाठपुरावा केला, त्यावरून त्यांनी सर्वसामान्यांच्या आरोग्याचा आणि प्रशासनातील भ्रष्टाचाराचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे लावून धरल्याचे दिसून येत आहे. आता या प्रकरणाच्या तपासात आणखी कोणते मोठे मासे गळाला लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




