नाशिक | Nashik
शहरातील रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे (Potholes) आतापर्यंत तब्बल सात जणांचा अपघाती मृत्यू (Death) झाला आहे. त्यामुळे राज्यभर नाशिकमधील रस्त्यांचा प्रश्न चांगलाच गाजत आहे.सिंहस्थ कुंभमेळ्याला अवघे काही महिने शिल्लक असतानाच शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि नागरिकांचे जात असलेले बळी यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
या पार्श्वभूमीवर उद्या (सोमवारी) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वतीने नाशिकमध्ये भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या मोर्चाचे नेतृत्व खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) करणार आहेत. या मोर्चाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी खासदार संजय राऊत नाशिकमध्ये दाखल झाले असून, त्यांनी नाशिकमध्ये (Nashik) माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
हा फडणवीस सरकारचा वस्त्रहरण मोर्चा असेल
यावेळी खासदार राऊत म्हणाले की, “नाशिकसारख्या महत्त्वाच्या शहरात खड्ड्यांमुळे सात लोकांचा मृत्यू होतो आणि येथील पालकमंत्री व कुंभमेळा मंत्री निर्लज्जपणे हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. लहान मुलेही आता सरकारची चेष्टा करत आहेत. त्र्यंबक रोडवर शंभराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी हे शहर ‘दत्तक’ घेतले होते, मग आता ही अवस्था का? उद्याचा मोर्चा म्हणजे फडणवीस सरकारचे वस्त्रहरण असेल, असे त्यांनी म्हटले.
कुंभमेळ्याच्या नावावर लुटालूट
पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राऊत म्हणाले की,”पंतप्रधान म्हणतात देशातील रस्ते ‘स्पेस टेक्नॉलॉजी’ने बनवले जात आहेत, पण प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे हे सर्वांना दिसत आहे. ज्यांना शहरातील खड्डे बुजवता येत नाहीत, ते कुंभमेळ्याचे आयोजन कसले करणार? अनेक साधू-संतांच्या मते कुंभमेळ्याच्या नावावर केवळ लुटालूट सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी शिवसेना रस्त्यावर उतरत असून, नाशिककरांनी या मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.




