Tuesday, February 3, 2026
HomeनाशिकNashik News : वकिलांचे न्यायाधीशांवर आक्षेप! कामकाजापासून राहिले अलिप्त

Nashik News : वकिलांचे न्यायाधीशांवर आक्षेप! कामकाजापासून राहिले अलिप्त

पालक न्यायमूर्तींना निवेदन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक वकील संघाने (Nashik Lawyers Association) जिल्हा न्यायालयातील पाच न्यायाधीशांच्या मनमानीसह कार्यपद्धतीवर आक्षेप घेत सोमवारी (दि. २) एकदिवसीय कामबंद आंदोलन केले. याबाबत, नाशिकचे पालक न्यायाधीश व प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे तक्रार दाखल केल्याने न्यायदान क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

जिल्हा न्यायालयातील विविध कोर्टात (Court) कार्यरत न्यायाधीश व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वकिलांना अपमानास्पद वागणूक देत कर्मचाऱ्यांवर थेट ‘फाईल्स फेकत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. याविरोधात वकील संघाने २ फेब्रुवारी रोजी जिल्हा न्यायाधीश आर. एम. पांढरे यांच्यासह आर. एस. कानडे आणि वरिष्ठ आणि सहदिवाणी न्यायाधीश एस. डी. हिवाळे, एस. एस. बांगड, एस. के. देवकर या पाचही न्यायाधीशांच्या दालनातील कामकाजातून अलिप्त राहून लाक्षणिक आंदोलन केले.

YouTube video player

नाशिक बार असोसिएशनने नाशिकचे पालक न्यायाधीश व मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांना दिलेल्या निवेदनानुसार, विविध कोर्ट रुममध्ये काम करत असताना काही न्यायाधीश वकिलांशी अरेरावी करतात.तसेच केसेस व दावे ‘तहकूब’ करुन वकिलांनी अर्ज दाखल करताच हवी कॉस्ट’ चा हुकूम काढतात. शिवाय पुकारा झाल्यावर वकील, पोलीस व कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देऊन थेट कर्मचाऱ्यांच्या अंगावर फाईल्स फेकतात.

काही न्यायाधीश न्यायदान कक्षात वेळेवर हजर राहत नाहीत. तसेच, फाईलच बंद करेल, अशी धमकी देतात, असा दावा वकिलांनी केला आहे.न्यायाधिशांच्या या वागणुकीमुळे न्यायालयीन कामकाजावर गंभीर परिणाम होत असून बार आणि बेंचच्या सलोख्याच्या संबंधात वितुष्ट निर्माण होत आहे. या प्रकारामुळे वकिलांसह पक्षकारांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास कमी होत असून संबंधितांवर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देऊनही योग्य कार्यवाही न झाल्याने नाशिक वकील संघाने कामाकाजापासून अलिप्त राहून आंदोलन केले व न्यायालयाबाहेर निदर्शन केली. त्यामुळे पाचही न्यायालयांतील खटल्यांचे कामकाज रखडले होते.

बदली करा….

संबंधित न्यायाधीशांच्या त्रासाने वकील वर्ग मेटाकुटीस आला असून त्यांच्या वर्तणुकीत बदल न झाल्यास त्यांची बदली करावी, अशीही मागणी नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, उपाध्यक्ष वैभव शेटे, सचिव हेमंत गायकवाड, सहसचिव संजय गिते यांच्यासह सर्वश्री वकील सोनल गायकर, कमलेश पाळेकर, शिवाजी शेळके, प्रतिक शिंदे, महेश यादव, अश्विनी गवते, वैभव घुमरे, जालिंदर ताडगे आदींनी केली आहे.

कारवाईकडे लक्ष

न्यायाधीश व वकील हे न्यायप्रणालीचे दोन पूरक घटक मानले जातात. गतवर्षी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील एका न्यायाधीशांना थेट निलंबित करण्यात आले होते. आता एक नव्हे, तर पाच न्यायाधीशांबाबत लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. न्यायाधीशांविरुद्ध आवाज उठवित कामबंद केल्याचा प्रसंग इतिहासात पहिल्यांदा नाशिकमध्ये घडला. आता या प्रकरणात न्यायमूर्तीसह प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश काय भूमिका घेतात, पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

ताज्या बातम्या

Ravindra Pagar Passed Away : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार (Ravindra Pagar) यांचे अल्पशा आजाराने (आज दि.३) निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बुधवार दि....