नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेकडून (Nashik Municipal Commissioner) सुरू असलेल्या सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या रस्ते व पायाभूत सुविधा कामांवरून सुरू असलेल्या टीकेला महापालिका आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘सिंहस्थाच्या कामात एक जरी चूक काढून दाखवा, मी माझे नाव बदलेन,’ असे थेट आव्हनच त्यांनी टीकाकारांना दिले.
कामांच्या निविदा आणि गुणवत्तेबाबत महापालिकेने पूर्ण पारदर्शकता ठेवली असून, ज्यांना आक्षेप आहेत त्यांनी पुराव्यासह त्रुटी दाखवाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुमारे १ हजार २३० कोटी रुपये खर्चुन २९ रस्त्यांची कामे सुरू आहेत. याशिवाय पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि रस्ते अशा विविध पायाभूत सुविधांची मिळून सुमारे पाच हजार कोटी रुपयांची कामे (Work) सुरू आहेत. मात्र, या कामांच्या दर्जावरून सोशल मीडिया तसेच राजकीय वर्तुळातून महापालिकेवर टीका होत आहे.
निविदा प्रक्रियेवरही काहींकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना आयुक्त खत्री यांनी महापालिकेची भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, महापालिका आयुक्त म्हणून माझे सर्वांना आवाहन आहे. मनपाची निविदा कागदपत्रे ऑनलाइन (Online) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कामांमध्ये पूर्ण पारदर्शकता ठेवली आहे. ज्यांना तपासायचे आहे त्यांनी जरूर कामे तपासावीत आणि आम्ही कुठे चुकलो आहोत, ते पुराव्यासह दाखवून द्यावे, असे त्यांनी सांगितले.
सिंहस्थ कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केलेली नाही आणि यापुढेही केली जाणार नाही, असे खत्री यांनी ठामपणे सांगितले. कामांवर महापालिका कठोरपणे लक्ष ठेवून असून, दर्जेदार कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सिंहस्थासाठी सुरू असलेल्या कामांवर सोशल मीडियातून प्रश्न उपस्थित होत असले, तरी प्रत्यक्ष कामांचा दर्जा तपासण्यासाठी सर्वांना खुले आव्हान दिल्याने आता टीकाकारांकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे लक्ष लागले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप चॅनेलला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
आयआयटीच्या पाहणीतही गुणवत्तेची खात्री
रस्त्यांच्या कामांमध्ये एम-४० आणि एम-६० दर्जाची सिमेंट स्ट्रेंथ निश्चित करण्यात आली आहे. या रस्त्यांच्या कामांची आणि गुणवत्तेची आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञ पथकाने पाहणी केली. पाहणीनंतर तज्ज्ञांनी कामांच्या गुणवत्तेबाबत सकारात्मक मत व्यक्त केल्याचे आयुक्तांनी सांगितले. एवढ्या चांगल्या दर्जाची कामे आम्ही कुठे पाहिली नाहीत, असे आयआयटीच्या पथकाने सांगितल्याचा दावा त्यांनी केला.




