नाशिक | प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या वतीने शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तसेच वाहनधारकांना वाहने पार्किंगची सोय व्हावी, यासाठी मनपाच्या वाहतूक सेलकडून लवकर ३५ ठिकाणी स्मार्ट पे अॅण्ड पार्कची सोय करण्यात येणार आहे. बेशिस्त पार्किंगला शिस्त लावण्यासाठी टोईंग कारवाई देखील मनपाकडून करण्यावर विचार सुरू असल्याचे समजते.
शहरात वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. शहरातील रस्ते वाहतुकीऐवजी जणू पार्किंग स्पॉटच बनल्याचे चित्र आहे. त्यावर तोडगा म्हणून मनपाने स्वतःचा ट्रॅफिक सेल कार्यन्वित केला असून पार्किंगची समस्या निकाली काढण्यास प्राधान्य दिले जात आहे.
आयुक्त मनीषा खत्री यांनी पार्किंगबाबत आराखडा सादर करा, असे आदेश दिले आहेत. ट्रॅफिक सेलने शहरात ३५ ठिकाणी ऑन स्ट्रिट व ऑफ स्ट्रिट पार्किंग स्थळे निश्चित केली आहे. येथे चारचाकी व दुचाकी असे साडेचार हजार वाहने उभी राहण्याची क्षमता राहणार आहे. त्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाईल, पण नुसते वाहनतळे उपलब्ध करुन दिली तरी त्यासाठी शुल्क आकारले जाणार असल्याने वाहनचालक त्याला प्रतिसाद देण्याची चिन्हे कमी आहेत. वाहनतळे उपलब्ध करुन देऊनही वाहनचालक खिशाला झळ नको म्हणून रस्त्यावरच वाहने उभी करु शकतात. त्यामुळे पार्किग निविदेतच टोईंगचाही समावेश करण्याचा विचार ट्रॅफिक सेलकडून सुरु आहे.
मनपा ट्रॅफिक सेलकडून पार्किंग व्यवस्था सुरु करण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांकडून एनओसी मागण्यात आले आहे. टोईंग यंत्रणा राबवणे पोलीस यंत्रणेचे काम आहे. तर मनपा स्वतः पार्किंग व्यवस्था उपलब्ध करुन देत असल्याने व स्वतःचा ट्रॅफिक सेल कार्यन्वित असल्याने टोईंग सुरु करु शकते, अशी माहिती मिळाली आहे.
वाहनतळ क्षमता
दुचाकी – ३,३००
चारचाकी – १,५५०
एकूण – ४,८५०
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा