नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये नाशिक जिल्ह्याने उल्लेखनीय यश मिळविले आहे. पंचायत समिती गटात नाशिक पंचायत समितीने (Nashik Panchayat Samiti) राज्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर जिल्हा परिषद गटात (Zilla Parisahd) नाशिक जिल्हा परिषदेनेही प्रथम क्रमांक मिळविला. ग्रामपंचायत गटात बागलाण तालुक्यातील लाडूद ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार पटकावून जिल्ह्याच्या यशात भर घातली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते अभियान २०२५-२६ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. रविवारी (दि. ११) पंचवटीतील (Panchvati) युथ फेस्टिव्हल मैदानावर आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पंचायत समिती गटात रायगड जिल्ह्यातील खालापूर पंचायत समितीने द्वितीय, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता पंचायत समितीने तृतीय क्रमांक मिळविला. जिल्हा परिषद गटात पुणे जिल्हा परिषदेने द्वितीय, तर सांगली जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांक पटकावला.
ग्रामपंचायत गटात रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील (Guhagar Taluka) कामशेत आणि नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील लाडूद या ग्रामपंचायतींना द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उटटी बुद्रुक आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कोतवालबर्डी ग्रामपंचायतींना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. ग्रामपंचायत स्तरावर प्रथम क्रमांकासाठी पाच कोटी रुपये, द्वितीय क्रमांकासाठी तीन कोटी रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी दोन कोटी रुपयांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. या पुरस्कारांसाठी १२ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. त्यापैकी पाच ग्रामपंचायतींना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पुरस्कार विभागून देण्यात आले.
अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ
यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० अंतर्गत जलसुरक्षा आणि लोकसहभागातून समृद्ध गाव घडविण्याचा संकल्प करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभही करण्यात आला. ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रास्ताविकात अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवून पंचायत प्रगती निर्देशांक उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जलतारा तज्ज्ञ प्रा. डॉ. पुरुषोत्तम वायाळ आणि ज्येष्ठ जलसंधारण कार्यकर्ते पद्मश्री पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन केले. अभियानाच्या पहिल्या टप्पा प्रभाविपणे राबविण्यात महत्वाच्या योगदानासाठी प्रधान सचिव एकनाथ डवले आणि यशदाचे उपसंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.




