मुंबई | Mumbai
दिवाळीच्या सणात फटाके फोडण्याऐवजी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झाचा व्हिडीओ मुंबई महापालिकेच्या सोशल मीडिया खात्यावरून हटवण्यात आल्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी या व्हिडीओवर आक्षेप घेतल्यानंतर महापालिकेने तो हटवला. त्यानंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिया मिर्झा यांच्यावर निशाणा साधत त्यांना ‘हिंदूविरोधी’ ठरवले. “दिवाळी कशी साजरी करायची हे दिया मिर्झांनी आम्हाला शिकवू नये,” असे म्हणत त्यांनी अभिनेत्रीला यापुढे महापालिकेच्या कार्यक्रमांत सहभागी करून घेतले जाणार नसल्याची भूमिकाही मांडली.
पत्रकार परिषदेत महापौर रितू तावडे म्हणाल्या की, “दिया मिर्झा यांनी कायम हिंदूविरोधी आणि अराजकता पसरवणाऱ्या घटकांना साथ देण्याचे काम केले आहे. गुजरातच्या जनतेच्या शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या नर्मदा प्रकल्पाला त्यांनी विरोध केला. नीट (NEET) परीक्षेच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्रोल केले. समान नागरी कायद्याला (UCC) विरोध दर्शवला, तर कधी काश्मीरमधील लष्कराच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.” असे म्हणत गंभीर आरोप केले.
राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; थेट दिले महत्वाचे आदेश
पुढे त्या म्हणाल्या, “स्वतः आलिशान लक्झरी गाड्यांमधून फिरताना आणि व्हीआयपी प्रवास करताना त्यांना स्वतःच्या कार्बन फुटप्रिंटचा विसर पडतो. पण, हिंदूंचे सण आले की लगेच त्यांना पर्यावरण आठवते. स्वतःच्या वैयक्तिक सोशल मीडिया हँडलवर त्या काय बोलतात? ते त्यांचे स्वातंत्र्य असू शकते, पण मुंबई महापालिकेच्या अधिकृत माय बीएमसी पोर्टलवर त्यांची प्रसिद्धी आम्ही खपवून घेणार नाही.” असा इशारा त्यांनी दिला.
महापौर रितू तावडे म्हणाल्या की, “”महायुती सत्तेत असताना हिंदू धर्माविरोधी आणि देशविरोधी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या लोकांना पालिकेच्या कोणत्याही अधिकृत कामात स्थान दिले जाणार नाही. आम्ही त्यांना 100 टक्के काळ्या यादीत टाकले आहे.” अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
“उच्च न्यायालयाने वाढत्या हवेच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सेलिब्रिटींच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार माधुरी दीक्षित आणि मराठी कलाकारांचे व्हिडीओ घेण्यात आले. मात्र जनसंपर्क विभागाने ही कलाकारांची यादी महापौर म्हणून माझ्या टेबलावर पाठवणे बंधनकारक होते. जर मला ती यादी दाखवली असती, तर मी सुरुवातीलाच दिया मिर्झाचे नाव रद्द करायला लावले असते.” असेही त्या पुढे म्हणाल्या.




