नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भर उन्हाळ्यात नाशिक महानगरपालिकेने (Nashik Municipal Corporation) अचानक ४८ तासांचा वॉटर शटडाऊन घेतल्यामुळे संपूर्ण शहरात पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही, जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे नाशिककरांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, संतप्त महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. स्मार्ट सिटीच्या कामांमुळे आधीच रस्ते खोदलेले असताना, आता पाणीही गायब झाल्याने नाशिककरांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात आहे.
महानगरपालिकेने शनिवारी (दि.४) आणि रविवारी (दि.५) शहरातील पाणीपुरवठा (Water Supply) पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. गंगापूर धरण ते बारा बंगला दरम्यानच्या मोठ्या व्यासाच्या पाईपलाईनचे काम, गळती दुरुस्ती आणि नवीन जोडण्यांसाठी हा शटडाऊन घेण्यात आला. मात्र, कडक उन्हाळ्यात पाण्याचा वापर वाढलेला असतानाच हा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेषतः सोसायट्या आणि झोपडपट्टी परिसरात पाण्यासाठी मोठी धावपळ उडाली.
आजही पाणीपुरवठा बंद
रविवारी (दि.५) ही पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. सोमवारी (दि.६) सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आधीच पाण्याची अडचण आहे, त्यात दोन दिवस पाणी बंद झाल्याने परिस्थिती बिकट झाली. पाणी विकत घेऊन स्वयंपाक करावा लागला.
सुमन पाटील, गृहिणी
शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी ही कामे अत्यंत आवश्यक आहेत. गळती रोखणे आणि क्षमता वाढवणे यामुळे भविष्यात अधिक सक्षम पाणीपुरवठा करता येईल.
रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता
उन्हाळ्यात जास्त पाणी लागते. त्यात मनपाने दोन दिवस पाणी बंद केल्याने सोसायटीसाठी जादा पैसे देऊन टँकरने पाणी आणावे लागले. महापालिकेने पर्यायी व्यवस्था करायला हवी होती.
राजू शेख, चेअरमन, राज सोसायटी, वडाळारोड





