नाशिक | प्रतिनिधी | Nashik
त्र्यंबकेश्वरपासून (Trimbakeshwar) हाकेच्या अंतरावर असलेल्या नाईकवाडी शिवारात (Naikwadi Shivar) अंबाडा व टोमॅटो पिकांच्या आड सुरू असलेल्या बेकायदेशिर गांजा लागवडीचा नाशिक तालुका पोलिसांनी (Nashik Taluka Police) पर्दाफाश केला आहे. शनिवारी (दि. २१) मध्यरात्री डोंगराळ भागातील शेतात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तब्बल ९८० किलो (जवळपास एक टन) गांजा सदृश हिरवी, ओली व ताजी झाडे, पाने आणि फांद्या असा सुमारे १ कोटी ४७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वामन संतु गुंबाडे या संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणावर लागवडीसाठी बियाणे कोठून आले, दुर्गम डोंगरावर ही शेती करण्याची कल्पना कशी सुचली, कापणी व विक्रीचे संभाव्य जाळे तयार होते का आणि यामागे संशयिताव्यतिरिक्त अन्य कोणाचा हात किंवा साखळी आहे का, याचा कसून तपास पोलीस करत आहेत. सुमारे दोन ते अडीच हजार लोकसंख्या असलेल्या नाईकवाडी गावाच्या (Village) परिसरात वनक्षेत्र तसेच लहान-मोठ्या डोंगरदऱ्या आहेत. मुख्य रस्त्यापासून दूर असलेल्या गट क्रमांक १४५ मधील डोंगरावरील शेतात थेट वाहनाने पोहोचणे शक्य नसून तेथे चालतच जावे लागते. ही आडवळणी शेती इतरांच्या नजरेत पडू नये म्हणून अंबाडा आणि टोमॅटो पिकांचा आधार घेतल्याचे समोर आले आहे.
वरकरणी सर्वसामान्य व नियमित शेती सुरू असल्याचा आभास निर्माण करण्याचा हा डाव पोलिसांनी (Police) उधळून लावला. पूर्वी नंदूरबार व लगतच्या काही भागांत गांजा लागवडीच्या घटना पुढे आल्या आहेत; मात्र नाशिक जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना तुलनेने क्वचितच घडतात. त्यातही जवळपास एक टन वजनाचा गांजा सदृश मुद्देमाल जप्त होणे ही बाब गंभीर मानली जात आहे. वनक्षेत्रालगतच्या व दुर्गम भागात अशी शेती आढळल्याने ग्रामीण भागातील इतर डोंगराळ व आडवळणी शेतांवरही अशा प्रकारची लागवड सुरू आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कायदेशीर कारवाई
या प्रकरणी एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क), २० (अ), २० (ब), २२ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रती किलो १५ हजार रुपये दराने मुद्देमालाची किंमत १ कोटी ४७ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. तपास पाेलीस निरीक्षक मृदुला नाईक करत आहेत. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि ग्रामीण भागात विकासकामे, वाहतूक व भाविकांची वर्दळ वाढणार आहे. अशा काळात अमली पदार्थांच्या बेकायदेशीर कारवाया रोखणे आणि दुर्गम भागांवर करडी नजर ठेवणे हे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.
नाईकवाडी शिवारात सुरू गांजा शेतीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार नाशिक तालुका पोलिसांनी ही कारवाई केली. प्राथमिक चौकशीत संशयिताचा हा पहिला प्रयत्न असल्याचे कळते. त्याचे साथीदार व इतर मुद्द्यांनुसार सखोल तपास सुरू आहे.
डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस अधीक्षक, नाशिक.




