Sunday, October 25, 2026
HomeनाशिकNashik News : 'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींकडून शबरी नॅचरल्सचा गौरव; केला...

Nashik News : ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींकडून शबरी नॅचरल्सचा गौरव; केला ‘हा’ खास उल्लेख

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत विकसित करण्यात आलेल्या ‘शबरी नॅचरल्स’ या ब्रँडची पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ‘मन की बात’च्या १३९ व्या भागात प्रशंसा केली. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे या ब्रँडचे पॅकेजिंग हे केवळ वेष्टन नसून सांस्कृतिक वारसा जपणारे माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले. या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठित ‘गुड डिझाईन अवॉर्ड’ मिळाल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

- Advertisement -

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या (Tribal Finance and Development Corporation) माध्यमातून उभारण्यात आलेल्या या ब्रँडने आदिवासींच्या पारंपरिक कला, नैसर्गिक उत्पादने आणि आधुनिक बाजारपेठ यांची सांगड घातली आहे. पॅकेजिंगमध्ये वारली, गोंड आणि चित्रकथी या कला परंपरांचा वापर करण्यात आला आहे. या वैशिष्ट्यपूर्ण डिझाईनला ‘इंडिया डिझाईन मार्क’चाही सन्मान मिळाला आहे.

जागतिक बाजारपेठ

शबरी नॅचरल्सने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि स्वतंत्र मोबाईल ॲपच्या माध्यमातून उत्पादनांची विक्री वाढविण्यावर भर दिला आहे. बांबू हस्तकला, नैसर्गिक व कृषी उत्पादने तसेच मोहापासून तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी विशेष हॅम्पर्स तयार करण्यात आले असून, त्यातून आदिवासी कारागीर, शेतकरी आणि महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी मिळत आहेत. पंतप्रधानांकडून झालेल्या गौरवामुळे आदिवासी उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

आदिवासी विकासाला राष्ट्रीय बळ

पंतप्रधानांनी केलेल्या गौरवामुळे शबरी नॅचरल्सच्या माध्यमातून सुरू असलेल्या आदिवासी विकासाच्या प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर बळ मिळाले आहे. हा ब्रँड आदिवासी समाजाची परंपरा आणि उद्योजकतेची यशोगाथा असून, डिजिटल माध्यमे व कॉर्पोरेट गिफ्टिंगच्या माध्यमातून ग्रामीण उद्योजकतेला जागतिक दिशा मिळेल.

मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास

आदिवासींच्या समृद्ध परंपरा आणि कलाकृतींना जागतिक बाजारपेठ मिळावी, हा शबरी नॅचरल्सच्या निर्मितीमागील मुख्य उद्देश आहे. पंतप्रधानांनी या ब्रँडची दखल घेतल्याचा अभिमान आहे. सर्वांनी मिळून आदिवासी संस्कृती साजरी करावी.

  • आयुक्त लीना बनसोड, आदिवासी विकास

ताज्या बातम्या