
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गृहविभागाने (Home Department) राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या (Police Officer) बदल्या केल्या आहेत. त्यावर कार्यवाही सुरू असून अनेक जागा रिक्त झाल्यावर ज्यांची बदली झाली आहे त्यांनी ‘चार्ज’ सोडला नसून जे नव्याने बदलून येणार आहेत, तेदेखील हजर झाले नसल्याने नवनियुक्तांसह सध्याच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा अपेक्षित बदलीसाठी ‘धावाधाव’ केल्याचे समजते.
आगामी सिंहस्थासह (Simhastha) मनपा निवडणुकीच्या (NMC Election) दृष्टिकोनातून सध्याच्या नियुक्त्या महत्त्वाच्या असल्याने ‘मर्जी’ राखण्याचेही प्रयत्न होण्याची शक्यता आहे. राज्यातील अधीक्षक व उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दहा दिवसांपूर्वी जारी करण्यात आले. त्यानुसार नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) अधीक्षक भारत तांगडे यांनी पदभार स्वीकारला आहे. मात्र नाशिक पोलीस आयुक्तालयात नियुक्त झालेले किशोर काळे व योगेश चव्हाण हे उपायुक्त शनिवारी (दि. ५) उशिरापर्यंत हजर झालेले नाहीत.
सध्याचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी व प्रशांत बच्छाव हेदेखील बदलीनंतर त्यांच्या पदभारावर कायम आहेत. एसीबीच्या (ACB) तत्कालीन अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर या छत्रपती संभाजीनगरात उपायुक्त पदावर रुजू झाल्या असून शहर आयुक्तालयातून गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांची कोल्हापूर (Kolhapur) येथील नागरी हक्क संरक्षण विभागात तर मुख्यालय उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांची धुळे येथील प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे. मात्र, अद्याप त्यांनी ‘चार्ज’ सोडलेला नाही.
दोघांनीही नाशिक एसीबी (Nashik ACB) यासह इतर ‘अपेक्षित’ ठिकाणी बदलीकरता प्रयत्न केल्याचे समजते. त्यातच धुळे अपर अधीक्षक पदावरून हजर होणारे किशोर काळे व मुख्यमंत्री सुरक्षा विभागातून येणारे योगेश चव्हाण हेदेखील नाशिकमध्ये रुजू न झाल्याने त्यांचेही इतरत्र बदलीसाठी प्रयत्न सुरू आहेत की ‘वेट अॅण्ड वॉच’ च्या भूमिकेत आहेत यासंदर्भात चर्चा सुरू आहे.
गुन्हे शाखा कोणाकडे?
शहर आयुक्तालयातील मुख्यालय व गुन्हे ही दोन्ही पदे रिक्त होत असून परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांच्या बदलीचे आदेश जारी झालेले नाहीत. त्यामुळे नवनियुक्तांपैकी एखाद्याची वर्णी गुन्हे उपायुक्तपदी लागण्याची शक्यता आहे. मात्र, बदलीनंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी मूळ पदभार न सोडल्याने आयुक्तालयातील फेरबदलांची प्रक्रियाही रखडली आहे. सिंहस्थाच्या दृष्टिकोनातून पुढील चार-पाच वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत राहण्यासाठी इतर वरिष्ठ निरीक्षकांनीही अपेक्षित पोलीस ठाणे व पथकांच्या ‘प्रभारी’ पदाकरता जोर लावला आहे.




