नाशिक | Nashik
गेल्या काही दिवसांपासून शहरातील रस्त्यांचा प्रश्न राज्यभर चांगलाच गाजत आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे (Potholes) नाशिककरांना मोठा त्रास सहन करावा लागत असून,आतापर्यंत या खड्ड्यांमुळे सहा जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे महापालिकेने (NMC) तात्काळ खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातील रस्त्यांची देखील अतिशय दयनीय अवस्था आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या साम्राज्याला कंटाळून अखेर शाळकरी चिमुकल्यांनाच रस्त्यावर उतरावे लागले आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) पेगलवाडी-गोहिरेवाडी परिसरातील विद्यार्थ्यांनी पाण्याच्या रिकाम्या बाटलीचा ‘मायक्रोफोन’ बनवून आपल्या गावातील रस्त्यांच्या दुरवस्थेचे अनोख्या पद्धतीने ‘ऑन-ग्राउंड रिपोर्टिंग’ केल्याचा चिमुकल्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या माध्यमातून प्रशासकीय कारभाराची उघडी पडलेली ‘पोलखोल’ सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
दरम्यान, या व्हायरल व्हिडिओची (Viral Video) स्थानिक लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ठेकेदारांच्या वरवरच्या मलमपट्टीमुळे रस्त्यांवर खड्डे पडतात असा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे आता या रस्त्यांची दखल प्रशासनाकडून घेतली जाते का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
‘खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा?’
नाशिक शहरासह (Nashik City) जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, नागरिक आणि दररोज शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंगच्या माध्यमातून ‘रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता?’ असा संतप्त सवाल विचारत स्थानिक प्रशासनाला उघडे पाडले आहे.
‘जनरेशन अल्फा’ची डिजिटल जनजागृती
दोन दिवसांपूर्वीच रायगड जिल्ह्यातील कोंडीवाडे येथील विद्यार्थिनींनी असाच प्रयोग करत रस्त्यांची दुरावस्था मांडली होती. आता नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी-गोहिरेवाडी येथील चिमुकल्यांनीही याच मार्गाने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. नव्या पिढीतील म्हणजेच ‘जनरेशन अल्फा’मधील विद्यार्थ्यांमध्ये आपल्या हक्कांबद्दल आणि परिसरातील समस्यांबद्दल निर्माण होत असलेली ही सामाजिक जागरूकता कौतुकास्पद असल्याचे सांगितले जात आहे.




