Thursday, July 9, 2026
HomeनाशिकNashik News : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ - धर्मध्वज शिलान्यासाने पर्वाची मंगल सुरुवात

Nashik News : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ – धर्मध्वज शिलान्यासाने पर्वाची मंगल सुरुवात

नाशिक् | Nashik

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Simhastha Kumbhmela 2027) च्या तयारीला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान देणाऱ्या धर्मध्वजस्तंभाच्या शिलान्यास व पूजन सोहळ्याला रामकुंड, पंचवटी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गोदातीरी गंगा-गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या वतीने आयोजित या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. मात्र रामकुंड परिसरात (Ramkund Area) सुरू असलेल्या खोदकामामुळे अनेक भाविकांना बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध झाली नाही.

- Advertisement -

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या व्यापक नियोजनाची माहिती देताना सांगितले की, यंदाच्या कुंभमेळ्यात १२ कोटींहून अधिक भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. मागील कुंभमेळा अत्यंत शांततेत आणि कोणतीही अनुचित घटना न घडता पार पडला होता. यंदाही सुरक्षा, सुविधा आणि व्यवस्थापनाबाबत विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. तर मान्यवरांनी गोदावरी नदी स्वच्छतेच्या कामांचा उल्लेख करताना सांगितले की, गेल्या पन्नास वर्षांत नदीची एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वच्छता कधीच झाली नव्हती. अतिक्रमण हटविण्याबरोबरच सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांमुळे नाशिकचा चेहरा-मोहरा पूर्णपणे बदलणार असून, देशभरातील भाविकांना त्याचा अनुभव येईल, असे म्हटले.

यावेळी बोलताना संजयदास महाराज म्हणाले, “ज्या व्यापक स्वरूपाचे धर्मकार्य नरेंद्राचार्य महाराज करीत आहेत, तसे कार्य अन्य धर्मगुरूंनीही समाजहितासाठी करावे. तर सोहळ्यात धर्मध्वजाच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित करताना वक्त्यांनी सांगितले की, “आपण सर्व सनातन धर्माच्या विविध शाखा आहोत. धर्मध्वज ही आपल्या प्राचीन संस्कृतीची आणि एकात्मतेची प्रतीकात्मक परंपरा आहे. शिलान्यास म्हणजे केवळ एका वास्तूचा पाया नव्हे, तर सामूहिक कल्याण, श्रद्धा, संघटन आणि शिस्त यांचा प्रारंभ आहे.

आगामी कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा हा शुभारंभ असल्याचे नमूद करताना संत-महंतांनी कुंभपर्वाचा खरा अर्थ स्पष्ट केला. अहंकार, मत्सर, मोह आणि द्वेष यांसारख्या दुर्गुणांचा त्याग करून सद्विचारांचे आचरण करणे, हेच खरे गोदास्नान असल्याचे त्यांनी सांगितले. आखाडा परंपरा, दक्षिण गंगा गोदावरीचे आध्यात्मिक महत्त्व, संतपरंपरा, पर्यावरण संवर्धन, विज्ञान आणि मानवी मूल्यांची सांगड घालणारा हा धर्मध्वज मानवतेच्या ऐक्याचा संदेश देणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

दरम्यान, या सोहळ्यास जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज, मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, विभागीय आयुक्त प्रविण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, आमदार देवयानी फरांदे यांच्यासह विविध आखाड्यांचे महंत, संत-महंत आणि हजारो भाविक उपस्थित होते. तसेच निर्मोही आखाडा, निर्वाणी आखाडा, दिगंबर आखाडा यांच्यासह राजेंद्रदास महाराज, माधवदास महाराज, ज्ञानदास महाराज, मुरलीधरदास महाराज आणि भक्तीचरण दास महाराज यांनी धर्मध्वज पूजनात सहभाग घेतला.

ताज्या बातम्या

Nashik News : मानधन घेऊनही कार्यक्रमाला दांडी; ‘या’ अभिनेत्रीला ...

0
नाशिक | Nashik कार्यक्रमासाठी मानधन स्वीकारूनही ऐनवेळी पाठ फिरवणाऱ्या अभिनेत्रीला नाशिक जिल्हा ग्राहक (Nashik Consumer Court) तक्रार निवारण आयोगाने मोठा दणका दिला आहे. "मानधन...