Tuesday, March 10, 2026
HomeनाशिकNashik News : रामकुंडावर हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; पुरोहित संघ आक्रमक

Nashik News : रामकुंडावर हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; पुरोहित संघ आक्रमक

पंचवटी पोलिसांना निवेदन; धार्मिक स्थळाचे पावित्र्य जपण्याची मागणी

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati 

रंगपंचमीच्या उत्सवानंतर रामकुंड परिसरात (Ramkund Area) काही तरुणांनी केलेल्या हुल्लडबाजीचा आणि असभ्य वर्तनाचा श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाने तीव्र निषेध केला आहे. याप्रकरणी दोषींवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी संघाच्या वतीने पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

रंगपंचमीनिमित्त (Rangpanchami) रामकुंडावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र, यावेळी काही उपद्रवी घटकांनी नदीकाठी रंग उधळत असताना सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्याचा आरोप पुरोहित संघाने केला आहे. रामकुंड हे केवळ पर्यटन स्थळ नसून ते कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी दररोज अस्थी विसर्जन, पिंडदान आणि दशक्रिया विधींसारखी धार्मिक कर्मकांडे सुरू असतात. अशा पवित्र ठिकाणी झालेला हा प्रकार निंदनीय असून, यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे निवेदनात म्हटले आहे. भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सणासुदीच्या काळात रामकुंड परिसरात वाढीव पोलीस (Police) बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

प्रशासनाचे दुर्लक्ष 

रंगपंचमीला रामकुंडावर गर्दी होणार हे निश्चित असतानाही पोलीस आणि महापालिका प्रशासनाने योग्य नियोजन का केले नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे. दरवर्षी या ठिकाणी अशा घटना घडण्याची भीती असतानाही सुरक्षेचा अभाव दिसून आला. पोलीस व प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळेच हुल्लडबाजांचे फावले असून, आता तरी प्रशासनाला जाग येणार का, असा संताप नाशिककरांमधून व्यक्त होत आहे. दोषींना शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, धार्मिक विधींच्या ठिकाणी हुल्लडबाजीला प्रतिबंध करावा तसेच सणांच्या दिवशी रामकुंडावर चोवीस तास पोलीस पहारा असावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 

घटना झाल्यावर नियम कायं कामाचे?

रामकुंड येथे घडलेला प्रकार भक्त-भाविकांच्या भावना दुखावणारा आहे. पवित्र स्थळाचा विचार विघातक प्रवृत्तीच्या टवाळखोरांना का आला नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच हा प्रकार घडण्यापूर्वी प्रशासनाने योग्य उपाययोजना का केल्या नाहीत, हाही मुद्दा उपस्थित होत आहे. दरम्यान, चप्पल फेक प्रकरणानंतर दुसऱ्याच दिवशी महानगरपालिकेकडून रामकुंड परिसरातून एक ट्रॅक्टरभर चप्पल-बूट उचलण्यात आले, ही बाब प्रशासनाच्या उशिरा झालेल्या कारवाईकडेच लक्ष वेधणारी आहे.

पंचवटीतील पवित्र रामकुंड परिसरात काही समाजकंटकांनी चपला घालून धुमाकूळ घालत एकमेकांवर चप्पलफेक करण्याचा तसेच काही चपला नदीपात्रात टाकण्याचा प्रकार केला. संपूर्ण जगाची ‘आई’ मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या या पवित्र तीर्थस्थळी नुसते दर्शन घेतले तरी पाप नष्ट होतात, अशी श्रद्धा असताना असा प्रकार होणे अत्यंत निंदनीय व निषेधार्ह आहे. या घटनेमुळे धार्मिक भावना दुखावल्या असून पावित्र्याचा भंग झाला आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करून भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी प्रशासनाने कटिबद्ध राहावे.

सतीश शुक्ल, अध्यक्ष, सिंहस्थ समिती

आमचा जन्म आणि आयुष्य गोदावरी नदीच्या तीरावरच गेले आहे. अनेक वर्षांपासून रामकुंड परिसरातील धार्मिक परंपरा आणि पवित्रता जपली जात असल्याचे आम्ही पाहिले आहे. मात्र यावर्षी घडलेला हा अशोभनीय प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. पवित्र रामकुंड परिसरात अशा प्रकारे गोंधळ घालणे व पावित्र्य भंग करणे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. भविष्यात असा प्रकार पुन्हा घडल्यास स्थानिक नागरिक आणि व्यापारी स्वतः पुढाकार घेऊन त्याचा बंदोबस्त करतील, असा इशाराही त्यांनी दिला.

कृष्णकुमार नेरकर, अध्यक्ष, व्यापारी संघटना

रामकुंड परिसरात घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे. उपलब्ध व्हिडिओच्या आधारे या ठिकाणी अशोभनीय वर्तन करणाऱ्या टवाळखोरांना ओळखण्याचे काम सुरू असून त्यांचा शोध घेतला जात आहे. संबंधितांची ओळख पटताच त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी पोलीस ठाणे

ताज्या बातम्या

Crime News : बिअर बार फोडून २ लाखांची विदेशी दारू लंपास;...

0
तळेगाव दिघे । वार्ताहर संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरात चोरट्यांनी आपला मोर्चा आता मद्यविक्री केंद्रांकडे वळवला असल्याचे दिसून येत आहे. संगमनेर रस्त्यावर असलेल्या 'हॉटेल रुपेश...