नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मुंबई उच्च न्यायालय (Mumbai High Court) प्रशासनाने राज्यातील वरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfer) आदेश साेमवारी(दि. १६) जारी केले असून, नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नेतृत्वात बदल करण्यात आला आहे. नाशिकचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांची बुलढाणा येथे बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी बुलढाण्याचे प्रमुख न्यायाधीश आर. एन. रोकडे (R.N. Rokde) यांची नाशिकच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जगमलानी यांनी सन २०२२ पासून नाशिक जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधीश म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या कार्यकाळात नाशिक जिल्हा न्यायालयाच्या (District and Sessions Court Nashik) इतिहासातील काही महत्त्वाच्या घटना घडल्या. भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण झाले. या भव्य इमारतीच्या निर्मितीसाठी आणि कामकाजाच्या नियोजनासाठी जगमलानी यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विविध लोकअदालतींमध्ये हजारो प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली, त्यातून सर्वसामान्य पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला हाेता. दरम्यान, उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल स्वप्निल खाटी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, राज्यातील इतरही काही न्यायाधीशांच्या (Jduge) बदल्या करण्यात आल्या आहेत.
तेव्हाही महत्त्वाची भूमिका
त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांतर्फे भाविकाला मारहाण प्रकरण व इतर मुद्द्यांवर जगमलानी यांनी महत्त्वाची भूमिका घेतली होती. या प्रकरणात न्यायालयीन चौकशीचेही आदेश त्यांनी दिले. यासह वणी येथील सप्तश्रृंगी देवी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती नुकतीच झाली असताना मुंबई उच्च न्यायालयाने या नियुक्तीवर स्थगिती दिली आहे. या घडमोडीनंतर जगमलानी यांची बदली झाली असून जिल्हा न्यायालयात कार्यरत काही न्यायाधिशांकडून वकिलांना अतिशय हिन वागणुक दिली जात असल्याचा आराेप नाशिक वकिल संघाने करुन तसे निवेदन जगमलानी यांनी दिले हाेते. त्यामुळे नवनियुक्त प्रमुख न्यायाधीशांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष आहे.
अन्य न्यायाधिशांचीही बदली
ठाणे येथील जिल्हा न्यायाधीश-७ जी. जी. भन्साळी यांची बदली मुंबई येथील शहर दिवाणी व अतिरिक्त सत्र न्यायालयात झाली आहे. अकोले येथील दिवाणी न्यायाधीश जी. डी. अग्रवाल यांची नियुक्ती अंचलपूर येथे दुसरे संयुक्त दिवाणी न्यायाधीश म्हणून झाली आहे. अचलपूरमध्येच कार्यरत असलेले एस. एस. साळवे यांचीही त्याच न्यायालयात दुसरे संयुक्त दिवाणी न्यायाधीश पदावर नियुक्ती झाली आहे. सोबतच ठाणे जिल्हा न्यायालयातील काही न्यायाधीशांच्या श्रेणीमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये जी. टी. पवार आता जिल्हा न्यायाधीश-७, डी. आर. देशपांडे जिल्हा न्यायाधीश-८, आर. एस. भाकरे जिल्हा न्यायाधीश-९ आणि एस. एस. रेंगे जिल्हा न्यायाधीश-१० म्हणून जबाबदारी सांभाळतील.





