नाशिक | Nashik
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे (Pune-Nashik Semi High Speed Railway) ही मूळ आरेखनानुसारच व्हावी, यासाठी जीएमआरटी आणि रेल्वेच्या तंत्रज्ञांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी खा. डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांची भेट घेऊन केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत हा रेल्वे प्रकल्प मध्य रेल्वे राबविणार असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले, जीएमआरटी आणि रेल्वेच्या तंत्रज्ञांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे रेल्वेमंत्र्यांनी मान्य केल्याचे नाशिक-पुणे रेल्वेचा जुना प्रस्ताव पुन्हा गतिमान होण्याची चिन्हे दिसू लागलेली आहेत.
गेल्या काही वर्षांपासून पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची चर्चा सुरु आहे. या आधी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने या रेल्वेचा डीपीआर तयार केला होता. या डीपीआरला केंद्रीय कॅबिनेटच्या (Central Cabinet) मंजुरी मिळालेली नव्हती. या प्रकल्पासाठी नाशिकच्या देवस्थानाची जागा मिळत नव्हती नंतर जीएमआरटी या महाकाय दुर्बिणीच्या प्रकल्पाने जागा देण्यास विरोध केल्याने हा प्रकल्प सुरु होण्यापूर्वीच बारगळत असल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर डॉ. अमोल कोल्हे यांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
जीएम आस्टी प्रकल्पच स्थलांतरित करा
खोडदच्या जीएमआरटी प्रकल्पाने (GMRT Project) महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या डीपीआरला आक्षेप घेतल्याने रेल्वेमंत्री वैष्णव यांनी या प्रकल्पाचा डीपीआर रद्द करून नव्याने आखणी करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनास दिले होते. त्यानुसार या सेमी हायस्पीड रेल्वेच्या मार्गात बदल करुन अहिल्यानगर, शिडी मार्गे नाशिक असा नवा मार्ग प्रस्तावित करण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र या नवीन मार्गाला खा. डॉ. कोल्हे यांनी विरोध दर्शवत जीएमआरटीच्या तंत्रज्ञांनी तोडगा काढावा अन्यथा जीएमआरटी प्रकल्पच स्थलांतरित करण्याची मागणी केली होती.
नव्या मार्गाला विरोध?
पुणे ते अहिल्यानगर, शिर्डी मार्गे नाशिक या रेल्वे मार्गास खेड, आंबेगाव, जुन्नरसह नगर जिल्ह्यातील संगमनेर सह अनेक गावांतील शेतकरी आणि लोकप्रतिनिधींचा विरोध असल्याचे बोलले जात आहे. मूळ मार्ग बदलल्यास आंदोलन करण्याची भूमिका शेतक-यांनी घेतली होती. मूळ रेल्वेमार्ग हा त्या भागातील जनतेची भाग्यरेषा बदलणारा असून, आजवर विकासापासून वंचित राहिलेल्या या भागाचा विकास या रेल्वेमार्गामुळे होणार असल्याची भूमिका खा. डॉ. कोल्हे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे मांडली होती.
मध्य रेल्वे राबवणार प्रकल्प
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान खा. डॉ. कोल्हे यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेऊन पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग बदलू नये, अशी मागणी केली. त्याचबरोबर महारेल, रेल्वे आणि जीएमआरटी तंत्रज्ञांची संयुक्त बैठक आयोजित करून तोडगा काढण्याची विनंती केली. यावेळी वैष्णव यांनी हा प्रकल्प मध्य रेल्वेच करणार असल्याचे स्पष्ट करतानाच प्रकल्पात कोणतीही राजकीय अडचण येणार नसल्याचे आश्वासन दिले. तसेच मध्य रेल्वे आणि जीएमआरटीच्या तंत्रज्ञांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे मान्य केले. त्यातून तोडगा काढून हा प्रकल्प गतिमान करण्यात येणार असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीत स्पष्ट केले असल्याचे वृत्त आहे.