नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क (आरटीई) शाळा नोंदणीची ४ जानेवारीची मुदत संपली आहे. कायद्यानुसार खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये राखीव जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यांना प्रवेश देण्यासाठी ही प्रक्रिया आहे. जिल्ह्यात (District) एकूण ४०५ शाळांची नोंदणी झाली आहे.गेल्या वर्षी नोंदणी झालेल्या शाळांची संख्या ४२१ होती. यावर्षी यात १६ शाळांची घट झाली आहे. काही शाळा अल्पसंख्याक झाल्या, तर काही शाळा बंद झाल्या, असे कारण जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) प्राथमिक शिक्षण विभागाने दिले आहे.
शैक्षणिक वर्ष (Academic Year) २०२५-२६ साठी आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेशपात्र शाळांची पडताळणी १८ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली. त्यानुसार प्रवेशपात्र शाळांनी शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक आणि वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करुनच संकेतस्थळावर अद्ययावत करावी. तसेच शाळांसाठी दिलेल्या वेळेत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत. आरटीई अंतर्गत शाळा नोंदणीसाठी शाळांना ३१ डिसेंचरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, शैक्षणिक संस्थांनी नोंदणीत उदासनीता दाखविली. त्यामुळे ही नोंदणीची मुदत ४ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली होती.
सर्वाधिक ८८ शाळा नाशिक शहरातील (Nashik City) शाळा नोंदणीच्या या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील एकूण ४०५ शाळांनी नोंदणी केली आहे. त्यात सर्वाधिक ८८ शाळा या नाशिक शहरातील आहे. त्या खालोखाल निफाड तालुक्यातही ४८ शाळांची नोंदणी झाली आहे. बागलाण तालुक्यात ४१, तर सिन्नर तालुक्यात ३१ शाळांची नोंदणी झाली आहे. तसेच चांदवड १७, देवळा १५, दिंडोरी २७, इगतपुरी १६, कळवण १४, मालेगाव २६, मालेगाव शहर १२, नांदगांव १८, नाशिक २१, पेठ १, त्र्यंचकेश्वर ४, येवला २५ याप्रमाणे अन्य तालुक्यांमध्येही शाळांची नोंदणी झाली आहे.